विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदारांना देण्यासाठी पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. अनिल गोटेंनी पैसे ठेवण्यात आलेल्या खोलीला कुलूप लावून ठिय्याही दिला. पहाटे खोलीतील पैसे मोजण्यात आले. १ कोटी ८४ लाख रुपये खोलीत आढळले, पण या प्रकरणाची फारशी चर्चा झाली नाही. आता याच प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी गृह मंत्रालयावर गंभीर आरोप केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनिल गोटे म्हणाले की, "धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या पैशाचे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न पोलिसांकडून वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत गुन्हा दाखल न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे."
'कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे प्रयत्न'
माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावरही याप्रकरणात गंभीर आरोप केला आहे. "हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश आहेत. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे", असे ते म्हणाले.
अनिल गोटेंनी दिला उपोषणाचा इशारा
"तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर जर गुन्हा दाखल केला गेला, तर मी आमरण उपोषण करेन. एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती आहे. जयकुमार रावल यांच्या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली होती. पण, नंतर तपास सीबीआयकडे देण्यात आला. खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल, तर प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे आणि धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली विश्वासार्ह समिती स्थापन करावी", अशी मागणी अनिल गोटे यांनी केली.