अडगळीच्या खोलीत आढळले ११ व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:02+5:302021-04-06T04:35:02+5:30

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात ११ व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र याबाबत जिल्हा ...

Eleven ventilators were found in the room | अडगळीच्या खोलीत आढळले ११ व्हेंटिलेटर

अडगळीच्या खोलीत आढळले ११ व्हेंटिलेटर

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात ११ व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे आमच्याकडे एकही व्हेंटिलेटर नसल्याचे वारंवार सांगत होते. मात्र सोमवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात पाहणी केली असता एका अडगळीच्या खोलीत ११ कोरे करकरीत व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचे आढळले.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक रुग्णांचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूला डॉ. माणिक सांगळे हेच जबाबदार असून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

जिल्हा रुग्णालयात ११ व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात शोधमोहीम राबवली. सर्जिकल वॉर्डच्या मागे असलेल्या खोलीत व्हेंटिलेटर असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मात्र त्या खोलीला कुलूप लावलेले आढळले. तेथे उपस्थित परिचारिकेला विनंती करून कुलूप उघडले असता ११ व्हेंटिलेटर अडगळीत धूळखात पडलेले आढळले. पदाधिकाऱ्यांनी धूळ साफ करून व्हेंटिलेटरची पूजा केली. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, डॉ. सुशील महाजन, पंकज गोरे, संजय वाल्हे, राजेश पटवारी, सचिन बडगुजर, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, संदीप चव्हाण, केशव माळी आदी उपस्थित होते.

डॉ. माणिक सांगळेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात पडलेली होती. मात्र जिल्हा शल्य चकित्सक डॉ. माणिक सांगळे वारंवार व्हेंटिलेटर नसल्याचे सांगत होते. व्हेंटिलेटरअभावी जिल्ह्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला जबादार धरून डॉ. सांगळे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Eleven ventilators were found in the room