धुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची ३ रोजी निवड; भाजपतर्फे नाव अद्यापही गुलदस्त्यात
By अतुल जोशी | Updated: December 29, 2023 18:44 IST2023-12-29T18:43:48+5:302023-12-29T18:44:22+5:30
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची ३ रोजी निवड; भाजपतर्फे नाव अद्यापही गुलदस्त्यात
अतुल जोशी, धुळे: जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्षाची निवड येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. दुसऱ्या टर्ममध्ये अध्यक्षपद १३-१३ महिन्यांसाठी देण्याचा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला होता. त्यानुसार अश्विनी पाटील यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १४ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्षाची निवड करण्यासाठी ३ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण असतील. ३ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत उमेदवारी अर्ज वाटप केले जातील. त्यानंतर दुपारी ३ वाजता सभा होईल, त्यात अध्यक्षपदाची निवड होईल. दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत असल्याने, अध्यक्ष भाजपचाच होईल, मात्र या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे निवडीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.