धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षपदी अश्विनी पवार, उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील
By अतुल जोशी | Updated: October 14, 2022 17:57 IST2022-10-14T17:56:06+5:302022-10-14T17:57:46+5:30
Dhule : पीठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षपदी अश्विनी पवार, उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील
धुळे : जिल्हा परिषदेच्या ३९ व्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या फागणे गटातून निवडून आलेल्या अश्विनी भटू पवार तर उपाध्यक्षपदी भाजपचे शिंगावे गटाचे देवेंद्र जयराम पाटील यांची ३८ विरूद्ध १६ मतांनी निवड झाली. दोन अपक्षांनी भाजपला साथ दिली. तर शिवसेनेच्या दोन सदस्या तटस्थ राहिल्या. निवडीनंतर भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
पीठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून अश्विनी भटू पवार, उपाध्यक्षपदासाठी देवेंद्र जयराम पाटील यांनी तर महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (उबाठा) धमाणे गटाच्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी कॅांग्रेसच्या बोरविहिर गटाच्या मोतनबाई रावण पाटील यांनी अर्ज दाखल केले.
हात उंचावून झालेल्या मतदानात अध्यक्ष,उपाध्यक्षांना प्रत्येकी ३८ तर महाविकास आघाडीच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते मिळाली. शिवसेनेच्या दोन महिला सदस्यांनी मतदाना सहभाग घेतला नाही. पीठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी अश्विनी पवार व उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.