कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:04+5:302021-05-13T04:36:04+5:30
धुळे : कोरोनाच्या संकटाने नागरिक बेजार झाले आहेत. मात्र ,अशा परिस्थितीतही खासगी प्रयोगशाळेकडून विविध चाचण्यांचे जास्त दर आकारून रुग्णांची ...

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट
धुळे : कोरोनाच्या संकटाने नागरिक बेजार झाले आहेत. मात्र ,अशा परिस्थितीतही खासगी प्रयोगशाळेकडून विविध चाचण्यांचे जास्त दर आकारून रुग्णांची लूट केली जात आहे. शहरातील काही प्रयोगशाळांचा रिॲलिटी चेक केला असता चाचण्यांचे वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या संसर्गाने नागरिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, जास्त दर आकारून प्रयोगशाळांकडून त्यांची लूट सुरू आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जास्त प्रमाणात वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सीबीसी, सीआरपी, आदी चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्या चाचण्यांबाबत रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना पुरेशी माहिती नसल्याने खासगी प्रयोगशाळा चाचण्यांचे ज्यादा दर आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एजंटांची टक्केवारी वेगळीच -
१ - काही रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या एजंटांकडून रुग्णांना विचित्र अनुभव आला आहे. आमच्या प्रयोगशाळेतून चाचणी करा असे सांगून ते त्यांचे कमिशनही काढून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.
२ - आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन, आदी कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळेतील कर्ममचारी घरीही येतात. चाचणी करण्यासाठी घरी आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेच्या दरापेक्षा जास्त दर आकारल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
३ - डॉक्टरांनी सांगितलेल्या विशिष्ट प्रयोगशाळेत चाचणी केली असता जास्त दर लागत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
यांच्यावर नियंत्रण कोणाचे -
कोरोना चाचण्यांचे दर शासनाने निश्चित केले आहेत. मात्र, इतर रक्ताच्या चाचण्यांचे दर निश्चित केलेले नाहीत.
रक्ताच्या चाचण्यांचे दर शासनाने निश्चित केल्यास रुग्णांची लूट थांबू शकते.
काही प्रयोगशाळा सॅम्पल तपासणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवितात. त्यामुळे जास्त पैसे मोजावे लागतात.