शिंदखेडा तालुक्यात १५ दिवसांत ३०६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:40+5:302021-03-16T04:35:40+5:30

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असले, तरी शिंदखेडा तालुक्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ...

306 patients in 15 days in Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यात १५ दिवसांत ३०६ रुग्ण

शिंदखेडा तालुक्यात १५ दिवसांत ३०६ रुग्ण

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असले, तरी शिंदखेडा तालुक्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण काहीसे कमी होते. त्यामुळे तालुकावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र आता हाच दिलासा चिंतेत परावर्तीत झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या तुलनेने कमी होती; मात्र मार्च महिन्यापासून तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच तालुक्यातील निमगूळ हे हॅाटस्पॅाट ठरलेले आहे. तालुक्यात गेल्या १५ दिवसांत ३०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

निमगूळ येथे आतापर्यंत सर्वाधिक १०७ रुग्ण उपचार घेत आहेत, तर चिमठाणे येथे २० ॲक्टिव्ह रुग्ण, दोंडाईचा १२ रुग्ण, वालखेडा १० रुग्ण, नरडाणा ६, शिंदखेडा ६, मालपूर ६ व विखरण येथे एक रुग्ण असून, हे रुग्ण तालुक्यातच उपचार घेत आहेत. उर्वरित कोरोनाचे रुग्ण हे धुळे सिव्हिल व खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भूषण मोरे यांनी सांगितले. तसेच निमगूळ येथे डॉ. हितेंद्र देशमुख व चिमठाणे येथे डॉ. नीलेश पाटील हे रॅपिड टेस्ट करून रुग्णांवर योग्य तो उपचार करीत आहेत.

नागरिकांनी व महिलांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला जाऊ नये व अशा कार्यक्रमांना बाहेर गावी जाणे टाळावे. महिलांनी एकत्र येऊन कुरडई, पापड करण्याचे थांबवावे, मास्कचा वापर करावा. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून कोरोना रॅपिड टेस्ट करून घ्यावी, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे यांनी सांगितले.

Web Title: 306 patients in 15 days in Shindkheda taluka