उस्मानाबाद : काेराेनाचा संभाव्य धाेका लक्षात घेता, प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. असे असतानाच दुसरीकडे जिल्ह्याला लस उपलब्ध करून देताना शासनाकडून हात आखडता घेतला जात आहे. मागील काही दिवसांत शेजारी असलेल्या बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला ५० टक्के लस कमी दिली जात आहे. याचा थेट परिणाम लसीकरणाच्या गतीवर हाेत असल्याचे आराेग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र हाेती. ही लाट काही अंशी ओसरल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. निर्बंध शिथिल केले असले तरी काेराेनाचा धाेका टळलेला नाही. असे असतानाही अनेक लाेक बेफिकीरपणे वावरत आहेत. अनेक जण मास्कचा वापर करीत नाहीत. सॅनिटायझर वापराचे प्रमाणही कमी झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी वावरतानाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळेच की काय, मागील पाच-सात दिवसांत काेराेनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ हाेऊ लागली आहे. काेराेनाचा हा धाेका लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडून काेराेना लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दीही हाेत आहे. असे असतानाच दुसरीकडे सरकारकडून उस्मानाबादला लस पुरवठा करताना हात आखडता घेतला जात आहे. शेजारी असलेल्या लातूर, बीड, नांदेडच्या तुलनेत जिल्ह्याला ५० टक्केच लस पुरवठा केला जात आहे. याचा थेट परिणाम आता लसीकरणाच्या गतीवर हाेऊ लागला आहे. अनेक लाेकांना लस न घेताच केंद्रावरून परतावे लागत आहे. या प्रश्नी लाेकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.
चाैकट...
दृष्टिक्षेपात लसपुरवठा...
आराेग्य यंत्रणेकडून लसीची मागणी केल्यानंतर ६ जुलै राेजी बीडला १७ हजार डाेस, लातूर २० हजार ८००, नांदेड १८ हजार ३०० तर उस्मानाबादला अवघे ९४०० डाेस उपलब्ध झाले. १४ जुलै राेजी बीडसाठी ८ हजार, लातूर ८ हजार, नांदेडसाठी १३ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्याला अवघे ४ हजार डाेस दिले. ११ जुलै राेजीही असेच चित्र हाेते. बीडसाठी १३ हजार ७००, लातूर १५ हजार ८००, नांदेड २१ हजार २०० तर उस्मानाबादला ६ हजार ८०० डाेस मिळाले हाेेते. याचा फटका लसीकरणाच्या गतीस बसत आहे.