विकेंड लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:09+5:302021-04-11T04:32:09+5:30
प्रतिदिन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही नागरिक नियमांचे ...

विकेंड लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते पडले ओस
प्रतिदिन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवस लॉकडाऊन जारी केला आहे. शनिवारी सकाळपासून पोलीस विभागाच्या वतीने शहरात फिरुन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानास प्रतिसाद देत शहरातील नेहरु चौक, राजमाता जिजाऊ चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, समता नगर, आनंदनगर परिसरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती. शिवाय, कोरोनाच्या धास्तीने अनेक नागरिकांनीही घरात राहणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले होते.
उस्मानाबाद आगाराच्या केवळ तीन बस धावल्या
लॉकडाऊनमुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे बसस्थानकात शनिवारी गर्दी कमी होती. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने दिवसभरात उस्मानबाद आगारातील लातूर मार्गावर दोन बसेस व हैदराबाद मार्गावर एक बस धावली आहे. शिवाय, इतर आगाराच्या दोन तीन बसेस मार्गस्थ झाल्या होत्या.
वाहतूक शाखेच्या पथकाने केली कारवाई
कोरोनाचा संसर्गास अटकाव बसावा, यासाठी विनाकारण फिरु नये, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे. असे असतानाही काही नागरिक दुचाकीवरुन शहरात फेरफटका मारत आहेत. अशा नागरिकांवर वाहतूक शाखेच्या पथकाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाईचा बडगा उगारला.