विक्रेत्यांनी थाटली दुकाने, वाहतूक काेंडी तीव्र...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:55+5:302021-02-05T08:18:55+5:30
पालिकेची डाेळेझाक -भाविकांसह स्थानिक नागरिकही हाेताहेत बेजार तुळजापूर :- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या चहूबाजूंनी लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे, तसेच शहरात ...

विक्रेत्यांनी थाटली दुकाने, वाहतूक काेंडी तीव्र...
पालिकेची डाेळेझाक -भाविकांसह स्थानिक नागरिकही हाेताहेत बेजार
तुळजापूर :- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या चहूबाजूंनी लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे, तसेच शहरात दररोज ग्रामीण भागातील ग्रामस्थांचीही मोठी रेलचेल असते. यातच मागील काही महिन्यांपासून श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरच भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी, भाविकांसह तुळजापूरकरांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागत आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराची लोकवस्ती वाढली आहे. वाढत्या लोकवस्तीत रहिवाशांच्या गरजादेखील वाढल्या आहेत. नगरपालिका या भागात सोयी-सुविधा पुरविण्यात कमी-अधिक प्रयत्न करीत आहे. तुळजापूर शहरात सुवर्नेश्वर गणपती मंदिराच्या पाठीमागे व जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागे भाजी मंडई भरविण्यात येत होती; मात्र या दोन्ही भाजी मंडईत पालिकेला अद्याप आवश्यक प्रमाणात साेयी-सुविधा पुरविता आलेल्या नाहीत.
कोरोना काळापासून सुवर्नेश्वर गणपती मंदिर पाठीमागील भाजी मंडई बंद करण्यात आली होती. ती अद्यापही बंदच आहे. तर अनेक वर्षांच्या जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील अपुऱ्या जागेत भाजी मंडई भरत आहे. येथे दुर्गंधीचे साम्राज्य आहे. पार्किंग व्यवस्था नाही. स्वछतेचाही पत्ता नाही. बेशिस्त वाहन पार्किंगचाही प्रश्न कायम आहे. हे थाेडके म्हणून की काय, श्री तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक या भागात भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मुख्य रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते बसत असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून भाजीपाला खरेदी करतात आणि येथूनच भाविकांची वाहने पार्किंगसाठी घाटशीळकडे जातात. त्यामुळे वाहतूक काेंडीत जास्तीची भर पडत आहे. वाहनांच्या गर्तेतून मार्ग काढीत लाेकांना दर्शनासाठी जावे लागते. ही बाब पालिका प्रशासनाच्या अनेकांनी निदर्शनास आणून दिली; परंतु काहीच बदल झाला नाही, हे विशेष.
◾दीपक चौक येथे भाजी विक्रेत्यांनी रोडवर दुकान मांडले असल्याने श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व स्थानिक रहिवासी यांच्या वाहनांना अडथळा हाेताे. परिणामी, वाहतुकीची कोंडी निर्माण हाेत आहे. भाविकांना या वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढणे जिकरीचे होऊन गेले आहे. काही वेळा येथे दुचाकी अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नगरपालिकेने या रोडवर अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे दीपक संघाचे माजी अध्यक्ष नितीन रोचकरी यांनी केली आहे.