देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:36 IST2025-11-23T07:36:37+5:302025-11-23T07:36:49+5:30
या संकटकाळात अणदूर येथील स्थानिक नागरिक देवदुतासारखे धावून आले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
अणदूर (जि. धाराशिव) - सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी देवदर्शनाचा पवित्र प्रवास एका क्षणात नियतीने हिरावून घेतला. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अणदूरनजीक (ता. तुळजापूर) शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
कासेगाव उळे (जि. साेलापूर) येथील एक कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक अणदूर येथील खंडोबाच्या दर्शनासाठी क्रुझर जीपमधून निघाले होते. त्यांची जीप नॅशनल ढाब्याजवळ येताच अचानक टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. जीप रस्त्यावरच उलटली. या अपघातात प्रवासी रस्त्याच्या कडेला ३० ते ४० फूट दूर फेकले गेले.
गंभीर जखमींवर सोलापुरात उपचार
या दुर्घटनेत पूजा हरी शिंदे (३०), सोनाली माऊली कदम (२२) आणि साक्षी बडे (१९) या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतचे ११ जण जखमी झाले. गंभीर जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संकटातही घडले माणुसकीचे दर्शन...
या संकटकाळात अणदूर येथील स्थानिक नागरिक देवदुतासारखे धावून आले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी एकत्र येऊन पलटी झालेली क्रुझर सरळ केली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत केली.