चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:28 IST2022-02-22T16:27:31+5:302022-02-22T16:28:02+5:30
गॅस कटरने मशीनमधील कॅश स्ट्रे कापून काढत पळवली रक्कम

चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली
कळंब ( उस्मानाबाद ) : कळंब शहरातील प्रमूख अशा ढोकी रोडवरील दोन वेगवेगळ्या बँकेच्या एटीएएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यात दहा लाखापेक्षा अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे .
मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. याचे लोण आता कळंब शहरात पोहचले असून शहरातील ढोकी रोड अर्थात लक्ष्मी रोडवर कार्यान्वित करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमसह एका खाजगी कंपनीच्या एटीएम सेंटरवर सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी हात साफ केला आहे.
यात रात्री 2 वाजून 28 मिनिटाच्या सुमारास दोन चोरांनी ढोकी नाका परिसरातील खाजगी कंपनीच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. तद्नंतर दरवाजा बंद करून गॅस कटरने मशीनमधील कॅश स्ट्रे कापून काढला व यातील जवळपास साडे तीन लाख रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान याच रात्री, याच रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला व लाखो रूपये गायब केले. याठिकाणी दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास केली असल्याचे समजते.या दोन्ही घटनेमुळे कळंब शहरात एकच खळबळ उडाली आहे.