बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 10:17 IST2023-08-17T10:10:03+5:302023-08-17T10:17:21+5:30
परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं, ते म्हणाले आपल्याच खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको

बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा
मुंबई/धाराशिव - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना पालकमंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. खेकड्याची उपमा देत पवार यांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर, मंत्री तानाजी सावंत यांनीही पलटवार केला आहे. तसेच, यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा माझे पदाधिकारीही ठोक शब्दात प्रत्युत्तर देतील, असा इशाराही सावंत यांनी दिला. यावेळी, सावंत यांनी रोहित पवारांच्या वयावरुनही टोला लगावला होता. त्यावरही, राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.
परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं, ते म्हणाले आपल्याच खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको. का अख्खा महाराष्ट्र तुम्हाला विकत घ्यायचाय का? असे म्हणत मंत्री सावंत यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, आपलं वय किती, आपण बोलतो किती?, माझ्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ते ऐकून घेतलं. पण यापुढे जर तुमची अशीच भाषा राहिली तर तुम्हाला तितक्याच ठोकपणे उत्तर दिलं जाईल, हे तानाजी सावंतचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात ठेवा, असा इशाराच मंत्री सावंत यांनी रोहित पवारांना दिला.
सर्वार्थाने उंची मोजायची झाली तर, रोहित पवारांची बौद्धिक पातळी निश्चितच उंच आहे. शारिरीक उंची मोजायची झाली तर डॉक्टरसाहेब तुमच्यापेक्षा रोहित पवारांची उंची निश्चितच जास्त आहे. कोणाच्या शरीरावरती, व्यंगावरती किंवा इतर बाबींवर टीका करणे म्हणजे स्वत:चं अपयश झाकू ठेवण्यासारखं आहे, हे सावंतांनी लक्षात घ्यावं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश काकडे यांनी तानाजी सावंत यांच्यावर पलटवार केला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार
''खेकड्याला खाज खूप असते, खेकडा जेव्हा खायचा असतो तेव्हा त्याची खाज उतरावी लागते. म्हणजे ती खाज आपल्याला येत नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. खेकड्याची उपमा देत त्यांनी सावंत यांना खोचक टोमणेही लगावले. अधिवेशनामध्ये भाषण करत असताना, एक तर ते काय भाषण करतात हे कळत नाही. कोरोना काळात ते आरोग्यमंत्री नव्हते या गोष्टीचं समाधान आहे. ते जर कोरोना कालावधीत मंत्री असते. बाबा.. बा..बा... काय झालं असतं, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी लगावला. तर, आता खऱ्या अर्थाने हाफकीनला बोलावण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी म्हटले.