डेपाे, स्थानकातून हाेणार नियंत्रण; चालक-वाहकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
उस्मानाबाद- लाॅकडाऊनमुळे काेट्यवधीचा फटका बसलेल्या एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या साेयीच्या दृष्टिकाेनातून व्हेईकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्रत्येक बसचे लाइव्ह लाेकेशन समजणार आहे. डेपाे, स्थानकातून बस सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टीमद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे.
व्हेईकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आजवर आगारातील सुमारे ४७८ पैकी ७४३ बसेसना सदरील किट बसविण्यात आले आहे. एवढेच नाही तर स्थानकाच्या परिसरात माेठे स्क्रीनही लावण्यात आले आहेत. सध्या ट्रायल सुरू आहे. येत्या सात ते आठ दिवसांत सर्व रुट निश्चित हाेतील. तसेच लहान-लहान तांत्रिक कामेही पूर्ण हाेतील. यानंतर बैठक घेऊन ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून गाडीचा वेग, लाेकेशन आणि थांबा, आदींची माहिती मिळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लागलीच वाॅर्निंग बेल येते. थांबा नसताना बस थांबल्यास अलर्ट टाेन येताे. या माध्यमातून चालक-वाहकांच्या निष्काळजीपणाला चाप बसणार आहे.
चाैकट..
स्थानकात लागले माेठे स्क्रीन
उस्मानाबाद स्थानकात व्हीटीएस प्रणालीचे माेठे स्क्रीन लागले आहेत. या माध्यमातून प्रवाशांना येणाऱ्या तसेच जाणाऱ्या गाड्यांची माहिती समजणार आहे.
थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली अथवा विनाकारण ब्रेक लावला तर या बाबी या सिस्टीममुळे स्क्रीनवर दिसतील. शिवाय यासंबंधीची वाॅर्निंग बेलही दिली जाते.
राेजच्या राे गाडीचे बुकिंग या सिस्टीममुळे केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जाताे. वाहक व चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर या सिस्टीमद्वारेच नियंत्रण ठेवले जाते.
चालकांना काेठेही गाडी थांबविता येणार नाही
प्रवासी नसताना वा थांबा नसतानाही आता चालक-वाहकांना काेठेही गाडी थांबविता येणार नाही; कारण गाडी थांबल्याबराेबर थेट डेपाेमध्ये आणि बसस्थानकात तिची माहिती कळते.
आगार व्यवस्थापकांकडे त्याचा खुलासा चालक-वाहकांना करावा लागेल. त्यामुळे वाहक-चालकांना निर्धारित वेळ पाळावी लागणार आहे.
प्रवाशांनाही आता बसस्थानकात गाडीची तासन्तास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पाेहाेचेल याची इत्थंभूत वेळ या सिस्टीमद्वारे कळणार आहे.
पाॅईंटर...
उस्मानाबाद आगारात या सिस्टीमचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ४४३ बसेसना ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. स्थानकातही माेठे स्क्रीन लागले आहेत.
आठ ते दहा दिवसांत ही सिस्टीम प्रत्यक्ष कार्यान्वित हाेईल. यानंतर गाडीचे ब्रेकडाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाला असेल तर याबाबतची माहिती सदरील सिस्टीमद्वारे कळेल.
चालक-वाहक आपल्या ताब्यातील वाहन व्यवस्थित चालवतील. यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसही वेळेवर स्थानकात येतील. परिणामी प्रवाशांची गैरसाेय दूर हाेईल.
काेट...
व्हेईकल ट्रॅकिंग सर्चिंग सिस्टीम प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर याचा सर्वाधिक फायदा प्रवाशांना हाेणार आहे. स्क्रीनवर बसेसचे लाेकेशन कळणार आहे. त्यामुळे तासन्तास स्थानकात ताटकळत बसावे लागणार नाही. कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकाेनातूनही महामंडळाला ही सिस्टीम फायदेशीर ठरेल.
- अश्वजित जानराव, वाहतूक नियंत्रक, उस्मानाबाद