उस्मानाबाद : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा घणाघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. उस्मानाबाद शहर व ग्रामीण भाजपा बुथ कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली, यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ॲड.अनिल काळे, ॲड.व्यंकट गुंड, ॲड.खंडेराव चौरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, माधव पवार, नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे यांची उपस्थिती हाेती.
आ.पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले, परंतु आजवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ना आर्थिक मदत मिळाली ना विमा. महिलांवरील अत्याचारातही दिवसागणिक वाढ हाेत असल्याने, हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काेराेनाचे संकट नियाेजनपूर्वक हाताळले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यासाेबतच शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, तरुणांसाठी विविध याेजना राबविण्यात येत आहेत. सरकारचे हे काम शेवटच्या घटकापर्यंत पाेहाेचावे, असे आवाहनही आ.पवार यांनी केले. यानंतर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्ह्यातील सर्व बुथनिहाय रचना पूर्ण होत आल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी केले. आभार नेताजी पाटील यांनी मानले.