लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:22 IST2025-11-21T15:21:08+5:302025-11-21T15:22:05+5:30
लोखंडी पाईपने घेतला जीव! धाराशिव पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली

लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या
धाराशिव : येथील वाघोली शिवारातील एका स्टोन क्रेशरवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये झालेल्या वादातून एका मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेत अन्य दोन मजूरही जखमी आहेत. ही धक्कादायक घटना २० नोव्हेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. लैंगिकतेवरून चिडविल्याच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली शिवारातील डी. सी. अजमेरा स्टोन क्रेशरवरील मजुरांच्या राहत्या पत्राच्या शेडमध्ये ही घटना घडली. आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग (रा. रांची, झारखंड, ह. मु. वाघोली) आणि मयत सुनील गांगू कुजूर (३१, रा. रांची, झारखंड, ह. मु. वाघोली) यांच्यात लैंगिकतेवरून चिडविण्यावरून जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या आरोपी सुमितकुमारने चौकोनी लोखंडी पाईपने सुनील कुजूर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले, ज्यामुळे सुनील गांगू कुजूर यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या धनेश खासा मुंडा यांनाही आरोपीने त्याच लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी मागन करोम लोहरा (६७) यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.
फिर्यादी मागन करोम लोहरा यांनी दिलेल्या प्रथम खबरीनुसार, धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग याच्यावर भान्यासं कलम १०३ (१) (हत्येचा गुन्हा), १०९ (१) (जीवे मारण्याचा प्रयत्न) आणि ११८ (१) (इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे. क्रेशरवरील मजुरांमध्ये झालेल्या या टोकाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.