तीन गावांना दिला एकच रंग, वृक्षाराेपणावरही भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:58+5:302021-04-11T04:31:58+5:30
बाबू खामकर पाथरुड : भूम तालुक्यातील शेवटच्या टाेकाला असलेली नळीवडगाव या ग्रुप ग्रामपंचायतीने ‘माझं गाव सुंदर गाव’ या ...

तीन गावांना दिला एकच रंग, वृक्षाराेपणावरही भर
बाबू खामकर
पाथरुड : भूम तालुक्यातील शेवटच्या टाेकाला असलेली नळीवडगाव या ग्रुप ग्रामपंचायतीने ‘माझं गाव सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यांतच ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे गिरलगाव, घुलेवाडीसह नळीवडगावचा चेहरमाेहरा बदलला आहे. रंगरंगाेटीसह वृक्षाराेपण, ग्रामस्वच्छता या बाबींवर अधिक भर दिल्याचे पहावयास मिळते.
भूम तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली नळीवडगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रियंका प्रवीण रणबागुल, ग्रामसेवक आर. एन. मुंडे व सदस्य यांनी पुढे येत ग्रामपंचायतीअंतर्गत ‘माझं गाव सुंदर गावं’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाध्ये ग्रामस्थांनाही सहभागी करून घेण्यात आल्या. त्यामुळे उपक्रमाची गती अधिक वाढली. या एकीच्या बळावर केवळ दीड महिन्यात तीनही गावांची एकाच रंगाच्या सहाय्याने रंगरंगाेटी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नारळाची सुमारे ६०० रोपे लावण्यात आली आहेत. केवळ वृक्षाराेपण करून थांबले नाहीत तर त्याच्या संगाेपनाची जबाबदारीही संबंधितांनी घेतली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांसाठी मोकळ्या डब्यांचे घर तयार करून गावांतील वेगवेगळ्या भागात झाडांवर बांधण्यात आले आहेत. त्यात चारा तसेच पाण्याची साेय केली आहे. नळीवडगाव गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीलाही आकर्षक रंग देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी केवळ रंगरंगाेटी अन् वृक्षारोपण करून थांबले नाहीत. तर त्यांनी ग्रामस्वच्छतेवरही माेठ्या प्रमाणात भर दिला आहे. ग्रामविकासाचे उपराेक्त उपक्रम हाती घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांनी अवघ्या दीड महिन्यातच कामाची चुणूक दाखवून दिली आहे.
माझं गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासह संपूर्ण गावाची एकाच रंगाने रंगरंगोटी केली. नारळाच्या ६०० राेपांचीही लागवड केली आहे. पक्ष्यांसाठीही चारा-पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- आर.एन. मुंडे, ग्रामसेवक, नळीवडगाव.
नळीवडगाव ग्रामपंचायतीने सध्या हाती घेतलेली कामे ही एकप्रकारे विकासाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात आदर्श गाव करण्यावर भर दिला जाणार आहे. तसे प्रयत्न सुरू आहेत.
-प्रियंका प्रवीण रणबागुल, सरपंच, नळीवडगाव.