पळून जाऊन लग्न, दीड वर्षाच्या संसारानंतर पोलिसांची 'एंट्री'; चिमुकलीसमोरच पित्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:40 IST2025-10-20T19:39:15+5:302025-10-20T19:40:40+5:30
तीन कुटुंबातील नातेवाइकांच्या संपर्क क्रमांकाच्या तांत्रिक तपासातून अंकुश धाराशिव जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

पळून जाऊन लग्न, दीड वर्षाच्या संसारानंतर पोलिसांची 'एंट्री'; चिमुकलीसमोरच पित्याला अटक
छत्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये कामा दरम्यान २२ वर्षीय मुलाची १६ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून दोघेही पळून गेले. यात मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. त्यांना मुलगी देखील झाली. तीच्यासह ते धाराशिवमध्ये एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामालाही लागले. मात्र, दीड वर्षानंतर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि मुलावर थेट कारागृहात जाण्याची वेळ आली.
२४ वर्षीय अंकुश २०२४ मध्ये वाळुज औद्योगिक वसाहतीत काम करत होता. तेथेच त्याची एका कामगाराच्या मुलीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. संसाराच्या आणाभाका घेत दोघांनी पळून जात लग्नही केले. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील अंकुशवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा नाशिकसह सर्वत्र शोध घेतला. मात्र, मोबाइल क्रमांक बदलून कुटुंबाच्याही संपर्कात नसल्याने ते पोलिसांना मिळून येत नव्हते. आपली मुलगी कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, या काळजीमुळे आई-वडीलही व्याकुळ झाले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपास वर्ग केला.
विभागाच्या प्रमुख सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचोळकर, पूनम परदेशी यांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यांच्या जवळपास तीन कुटुंबातील नातेवाइकांच्या संपर्क क्रमांकाच्या तांत्रिक तपासातून अंकुश धाराशिव जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.
शेतातच खोली, घरात पाच महिन्यांची चिमुकली
आपल्यावर गुन्हा दाखल झालाय, याची अंकुशला कल्पना नव्हती. केवळ कुटुंबाच्या भीतीने ते लपून होते. एका शेतकऱ्याचे शेत सांभाळून ते दोघे आनंदाने राहत होते. अंकुशच्या पत्नीने नुकतेच वयाचे १८ वर्षेे देखील पूर्ण केली आहेत. त्यांना पाच महिन्यांची मुलगी आहे. मात्र, तांत्रिक तपास करत पोलिस त्यांच्या शेतातील घरापर्यंत पोहोचताच दोघांना धक्का बसला. पत्नी अल्पवयीन असताना पळवून नेत लग्न केल्याने पोलिसांना त्याला अटक करावी लागली. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, तरीही अंकुशच्या जामिनासाठी न्यायालयातून लढून त्याच्यासोबतच संसार करेल, असे मुलीने बोलून दाखवले.