मुरुम : उमरगा तालुक्यातील आलूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य रोहित्रावर गेल्या पाच महिन्यांपासून भार वाढल्याने या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच गावांत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. शिवाय, दिवसांतून किमान दहा ते पंधरा वेळा वीजपुरवठा अचानक चालू-बंद होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली रबीची पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. दुसरीकडे अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे. दरम्यान, या कार्यालयाने रोहित्र क्षमतावाढीचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी पाठविला असून, अद्याप त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही.
या उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी २०१० ते ११ दरम्यान आलूर येथे पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. यामुळे मुरुम उपकेंद्रावरील भार काही प्रमाणात कमी झाला. आलूर उपकेंद्र सुरू झाल्याने सुरुवातीच्या काळात काही वर्षे सुरळीत वीजपुरवठा सुरू होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून आलूर उपकेंद्रावर भार वाढल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आलूर उपकेंद्राअंतर्गत अचलेर, आलूर, केसरजवळगा, वरनाळवाडी, बोळेगाव या पाच गावांना वीजपुरवठा केला जात आहे. या उपकेंद्रात सध्या पाच एमव्हीएचे रोहित्र असून, या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार झाला आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा तर खंडित होतोच, शिवाय कमी दाबाने होत असल्याने या भागातील शेतातील कृषीपंपही नीट चालत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यावर्षी परिसरात चांगला पाऊस झाल्याने या भागातील तलाव, कुपनलिका, विहिरींना बऱ्यापैकी पाणी आले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, मका आदी पिकांची लागवड केली आहे. सध्या ही पिके हातातोंडाशी आलेले आहेत. परंतु, विजेअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे या भागातील गावांत पाणीटंचाईचा प्रश्नही अधिक तीव्र झाला आहे. केसरजवळगा येथील नळांना आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. इतर गावांतही पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे महावितरणकडून या भागातील गावांचा वीजपुरवठा सुरळीतपणे करावा, अशी मागणी नागरिकांंतून होत आहे.
आलूर उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे. त्यामुळे उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पाच एमव्हीएच्या रोहित्राची गरज आहे. शिवाय शेतशिवारातील व गावठाणातील रोहित्रावरही भार वाढला आहे ऑक्टोबर ते मे या महिन्यात विजेची मागणी वाढत असते. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असेल. नागरिकांनीही समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत रोहित्राची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे. तो फक्त आलूर उपकेंद्रापुरता मर्यादित नसून अन्य ठिकाणीही आहे.
- आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंप कमी दाबाच्या विजेमुळे दिवसा चालत नाही. त्यामुळे गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील नळांना वेळेवर पाणी येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी महावितरणकडे लेखी स्वरुपात केली आहे.
जी. डी. हलबुर्ग, ग्रामविकास अधिकारी, केसरजवळगा
अधिकाऱ्यांना घेराव
महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे रबी पिके संकटात आली आहेत. यामुळे संतापलेल्या आलूर येथील काही शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी उपकेंद्राला टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकारानंतर थ्रीफेज वीजपुरवठ्याची वेळ आलूरसाठी रात्री करण्यात येईल, असे सांगून लवकरच वीजपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी टाळे उघडले.