Dharashiv Flood: भूम-परांड्यात पुरात अडकलेल्या २३९ जणांचे रेस्क्यू; NDRF चे धाराशिव जिल्ह्यात मोठे बचावकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:59 IST2025-09-25T12:56:02+5:302025-09-25T12:59:04+5:30
Dharashiv Flood Rescue: दोन दिवस मोठे रेस्क्यू ऑपरेशन! उसाच्या फडातून वाट काढत एनडीआरएफ जवानांनी गावकऱ्यांची केली सुटका.

Dharashiv Flood: भूम-परांड्यात पुरात अडकलेल्या २३९ जणांचे रेस्क्यू; NDRF चे धाराशिव जिल्ह्यात मोठे बचावकार्य
- संतोष वीर
भूम (धाराशिव): जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि नदीच्या पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटानंतर प्रशासनाने तातडीने पुणे येथील एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना (५ बटालियन) पाचारण केले होते. या तुकड्यांनी भूम आणि परांडा तालुक्यात मोठे बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) राबवले.
भूम तालुक्यातील जयवंत नगर येथील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असला तरी, पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मोठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज पडली नाही. मात्र, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवळाली गावात गणेश तांबे (वय ३८) हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. या युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने सलग दोन किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन केले. दुर्दैवाने, शोध सुरू असलेल्या भागात उसाचे मोठे फड असल्याने बोटींना सातत्याने अडथळा येत होता. यामुळे जवानांना सर्च ऑपरेशनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि युवकाचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.
परांड्यात २३९ नागरिकांची यशस्वी सुटका
याउलट, परांडा तालुक्यात पूरपरिस्थिती अधिक गंभीर होती. नदीचे पाणी गावांमध्ये शिरल्याने येथे भयानक पूरस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफच्या जवानांनी येथे तब्बल दोन दिवस रात्रंदिवस अथक परिश्रम घेत मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यामध्ये वागेगव्हाण, कपिलापुरी, जगताप वस्ती आणि ठोंगे वस्ती या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वागेगव्हाण (१८०), कपिलापुरी (१२), जगताप वस्ती (२७) आणि ठोंगे वस्ती (२०) अशा एकूण २३९ नागरिकांना जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.
जवानांच्या धाडसाला सलाम
एनडीआरएफ टीमचे प्रमुख इन्स्पेक्टर महेंद्रसिंग पुनिया यांनी माहिती दिली की, ठोंगे वस्ती भागात उसाचे आणि मकाचे फड असल्याने पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत बोट पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे जवानांनी बोट बाजूला लावून पाण्यातून वाट काढत नागरिकांपर्यंत पोहोचले आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले. एनडीआरएफ जवानांचे हे धाडसी काम पाहून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि जवानांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रशासनाकडूनही या बचावकार्याची दखल घेण्यात आली आहे.