जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी केली टाळूवरील म्युकरची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST2021-07-30T04:34:15+5:302021-07-30T04:34:15+5:30

उस्मानाबाद : दोन महिन्यापूर्वी म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास पुन्हा टाळूवर म्युकरची लक्षणे दिसून आली. रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ...

Private doctors performed pelvic mucosal surgery at the district hospital | जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी केली टाळूवरील म्युकरची शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी केली टाळूवरील म्युकरची शस्त्रक्रिया

उस्मानाबाद : दोन महिन्यापूर्वी म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास पुन्हा टाळूवर म्युकरची लक्षणे दिसून आली. रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे न परवडणारे होते. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी दाखवत २७ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या सेवेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील एका ३५ वर्षीय पुरुषाचे दोन महिन्यापूर्वी नाका भोवतालचे सायनस मधील म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया झाली होती. या रुग्णास २१ दिवस इंजेक्शन देण्यात आले. परंतु, दोन महिन्यांनी त्याला टाळूवर म्युकरची लक्षणे आढळून आली. त्यामुळे टाळूवरील शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रुग्णाची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याने टाळूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. कृष्णा देशमुख व डॉ. अजय अंधारे यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख यांनी विनंती केली. दोघांनी मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. रुग्णांचे तोंड कमी उघडत असल्याने भूल देण्यास अडथळा येत होता. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डॉ. प्रवीण डुमने यांना त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणारे ब्रोन्कोस्कोपी मशीन घेऊन येण्याची विनंती केली. ते जिल्हा रुग्णालयात तातडीने ब्रोन्कोस्कोपी मशीन घेऊन आले. डॉ. सतीश आदटराव व डॉ. श्रीकांत बलवंडे यांनी भूल दिली. लागलीच डॉ. कृष्णा देशमुख व डॉ. अजय अंधारे यांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉ. सचिन देशमुख व डॉ. रवींद्र पापडे उपस्थित होते. रुग्णांची आर्थिक परिस्थिती अडचणीची असताना खाजगी डॉक्टरांनी विनामोबदला रुग्णाची साहाय्यता करून दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च वाचवून सामाजिक बांधिलकी दाखविली. डॉक्टरांच्या कामाचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अभिनंदन केले.

Web Title: Private doctors performed pelvic mucosal surgery at the district hospital