न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस उस्मानाबादेत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:39+5:302021-07-14T04:37:39+5:30

उस्मानाबाद : न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन या लसीचा नियमित कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. ही लस जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण ...

Pneumococcal Conjugate Vaccine Campaign Launched in Osmanabad | न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस उस्मानाबादेत प्रारंभ

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस उस्मानाबादेत प्रारंभ

उस्मानाबाद : न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन या लसीचा नियमित कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. ही लस जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत मिळणार असून, मंगळवारी येथील जिल्हा रुग्णालयात त्याचा शुभारंभ करण्यात आला.

र्स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे होणारा न्यूमोनिया हा पाच वर्षांच्या आतील बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या-पिण्यात अडचण येऊ शकतात, फिट येऊ शकते, बेशुद्ध होऊ शकतात आणि मृत्यूदेखील होऊ शकतो; परंतु, पीसीव्ही या लसीकरणामुळे बालकांमधील न्यूमोकोकल आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टळू शकतात. गंभीर न्यूमोकोकल आजार होण्याचा धोका दोन वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. परंतु, एक वर्षाच्या आतील बालकांमध्ये तो धोका सर्वांत अधिक असतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर न्यूमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण तर होईलच, शिवाय समाजातील इतर घटकांमध्ये न्यूमोकोकल आजाराचा धोका कमी होईल. न्यूमोकोकल आजार टाळण्यासाठी पीसीव्ही लसीकरण हा सगळ्यात कमी खर्चिक आणि प्रभावी उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पीसीव्ही लसीकरणाचा नियमित लसीकरणात समावेशाचा जिल्हास्तरीय शुभारंभ येथील स्त्री रुग्णालयात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा ठोंबरे, डॉ. सोनटक्के, डॉ. माने, डॉ. मिनीयार, अधिसेविका सुमित्रा गोरे, देशमुख, भाटे, अधिपरिचारिका दाने यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

चौकट.........

असे मिळणार तीन डोस...

या मोहिमेत बालकांना पहिला डोस सहाव्या आठवड्यात, दुसरा डोस चौदाव्या आठवड्यात आणि बुस्टर डोस नऊ महिने या वयात दिला जाणार आहे. न्यूमोकोकल आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी सर्व पात्र बालकांना हे तिन्ही डोस मिळतील, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Pneumococcal Conjugate Vaccine Campaign Launched in Osmanabad