'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:57 IST2026-01-23T16:57:07+5:302026-01-23T16:57:42+5:30

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत धाराशिवमधून तिघांना अटक केली आहे, तर लातूरमध्ये सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

Outbreak of anger against 'EVM'! Bus vandalized at Latur-Dharashiv bus stand | 'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड

'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड

धाराशिव/लातूर: निवडणुकीत 'ईव्हीएम'चा वापर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांत आंदोलकांनी 'लालपरी'ला लक्ष्य करत तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत धाराशिवमधून तिघांना अटक केली आहे, तर लातूरमध्ये सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

धाराशिवमध्ये उपोषणाच्या समर्थनार्थ तोडफोड कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे एका संस्थेचे अध्यक्ष 'ईव्हीएम' विरोधी मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र संताप होता. हाच राग व्यक्त करण्यासाठी साईनाथ सावंत, श्रावण शिंदे आणि अमोल भोंग या तिघांनी धाराशिव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेसवर आधी पत्रके चिकटवली आणि त्यानंतर दगडफेक करून नुकसान केले. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे या तिघांना २४ तासांत अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली ७.५ लाखांची कारही जप्त केली आहे.

लातूरमध्ये पहाटेचा थरार 
असाच प्रकार लातूरच्या जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्रमांक २ वर घडला. २२ जानेवारी रोजी पहाटे एकच्या सुमारास एका सिल्वर-ग्रे रंगाच्या कारमधून आलेल्या ३ ते ४ जणांनी ''ईव्हीएम हटवा, लोकतंत्र वाचवा'' अशा घोषणा देत बसस्थानकात प्रवेश केला. त्यांनी चार एसटी बसेसवर पोस्टर्स चिकटवले आणि दगडफेक करून काचा फोडल्या. या हल्ल्यात सरकारी मालमत्तेचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगार प्रमुख संतोषकुमार बिरादार यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारचा माग काढला जात आहे.

प्रशासनाचे आवाहन 
आंदोलन करण्याचा लोकशाहीत अधिकार असला, तरी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. अशा कृत्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, अशा हिंसक कृत्यात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title : ईवीएम विरोध ने हिंसक रूप लिया: लातूर, धाराशिव में बसों में तोड़फोड़

Web Summary : ईवीएम के बजाय मतपत्रों की मांग को लेकर धाराशिव और लातूर में विरोध प्रदर्शन हिंसक हो गया। बसों में तोड़फोड़ की गई, जिससे धाराशिव में गिरफ्तारियां हुईं और लातूर में जांच जारी है। पुलिस ने तोड़फोड़ के खिलाफ चेतावनी दी है।

Web Title : EVM Protests Turn Violent: Buses Vandalized in Latur, Dharashiv

Web Summary : Protests demanding ballot papers instead of EVMs turned violent in Dharashiv and Latur. Buses were vandalized, leading to arrests in Dharashiv and an ongoing investigation in Latur. Police are warning against vandalism.