बेकायदेशीर पवनचक्कीचे पोल उखडून टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:10+5:302021-08-24T04:37:10+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपूर्वी सिमेंस गमेशा पवनचक्की कंपनी व सुयोग ऊर्जा प्रा. लि. पवनचक्की कंपनीने लोहारा, तुळजापूर ...

Let's uproot the illegal windmill poles | बेकायदेशीर पवनचक्कीचे पोल उखडून टाकू

बेकायदेशीर पवनचक्कीचे पोल उखडून टाकू

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपूर्वी सिमेंस गमेशा पवनचक्की कंपनी व सुयोग ऊर्जा प्रा. लि. पवनचक्की कंपनीने लोहारा, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पवनचक्कीचे पाेल उभारून विद्युत वाहिन्या ओढल्या आहेत. यासाठी कंपनीने शेतकऱ्यांना एका पोलसाठी ७५ हजार रुपये देण्याचा करार केला होता. मात्र, कंपनीने काही मोजक्याच शेतकऱ्यांना रक्कम दिली आहेत, तर काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. कंपनीने २ सप्टेंबरपूर्वी मोबदला शेतकऱ्यांना न दिल्यास पवनचक्कीचे पोल काढून टाकण्यात येतील, असा इशारा ॲड. आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

यावेळी ॲड. आशिष पाटील यांनी सांगितले, करार न करता तसेच बनावट दस्त नोंदवून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीने पवनचक्कीचे विद्युत पोल उभारून विद्युत वाहिनी नेली आहे. तसेच काहींना पैशाचे आमिष दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून शेतात पवनचक्की पोल उभे केले आहेत. जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांच्या शेतात ६ हजार पोल उभारले आहेत. काही शेतकऱ्यांना विद्युत पोलसाठी ७५ हजार रुपये देण्यात आले तर कोणाला १ ते ५ हजार रुपये दिले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारल्यास उलट शेतकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी ८ जुलै रोजी शेतकरी व कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ८ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळै २ सप्टेंबर रोजी बेकायदेशीर पोल उखडून टाकण्यात येणार आहेत. या आंदोलनात ४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी सतीश खाडे, एकनाथ देवकर, पांडुरंग देवकर, महेश उंडे, सिद्धेश्वर जाधव, शहाजी शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Let's uproot the illegal windmill poles