धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर
By बाबुराव चव्हाण | Updated: September 12, 2023 14:40 IST2023-09-12T14:38:18+5:302023-09-12T14:40:22+5:30
मराठा युवकांनी धाराशिव येथील जिल्हाकचेरीसमोर पालकमंत्री सावंत यांच्या प्रतिमेस बांगड्याचा आहेर सादर करुन प्रतिमेचे दहन केले.

धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर
धाराशिव : मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून अद्यापही कोणताच ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करीत मराठा तरुणांनी मंगळवारी धाराशिव येथे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन केले.
पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सोमवारी धाराशिव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्णय आपल्या पद्धतीने लागेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाकडून आरक्षणाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचा आरोप करीत मराठा युवकांनी धाराशिव येथील जिल्हाकचेरीसमोर पालकमंत्री सावंत यांच्या प्रतिमेस बांगड्याचा आहेर सादर करुन प्रतिमेचे दहन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देतं नाही, घेतल्याशिवाय राहंत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला.