आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST2021-07-29T04:32:19+5:302021-07-29T04:32:19+5:30
तालुक्यातील विविध गावांत साथरोगांनी डोके वर काढले आहे. विशेषत: तापाचे रुग्ण वाढले आहेत. याचा बालकांना जास्त फटका सहन करावा ...

आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट!
तालुक्यातील विविध गावांत साथरोगांनी डोके वर काढले आहे. विशेषत: तापाचे रुग्ण वाढले आहेत. याचा बालकांना जास्त फटका सहन करावा लागत आहे. डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने हैराण झालेली अनेक बालके कळंब शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असले, तरी ग्रामीण आरोग्याचा भार असलेला आरोग्य विभाग व स्वच्छतेची जबाबदारी असलेला ग्रामविकास विभाग कोणतीही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात ना गृहभेटी ‘प्रॉपर’ होत आहेत, ना किटक सर्वेक्षण. यामुळे सुस्तावलेला आरोग्य विभाग जागा होणार कधी, असा संतापजनक सवाल केला जात आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात तापाच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मांडली होती. याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांनी तातडीने दखल घेत, कार्यवाहीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानुसार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी कन्हेरवाडी, ईटकूर आदी गावात बुधवारी भेटी दिल्या. कन्हेरवाडी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, आंदोरा केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी तर ईटकूर येथे पं.स.चे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, ग्रा.पं. सदस्य हनुमंत कस्पटे यांच्याशी चर्चा करून गावात नाली, पाणीसाठे यांची पाहणी केली.
गृहभेटी, कीटक सर्वेक्षणाच्या सूचना
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी ईटकूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव उपस्थित होते. त्यांनी साथरोगांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंखे, आरोग्यसेवक पाटील, वाघमारे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश वेदपाठक, आरोग्यसेविका यांची बैठक घेऊन गृहभेटी, कीटक सर्वेक्षण यांच्या सूचना दिल्या.
तातडीने पाणी तपासणी, ॲबेटिंग करणार...
यावेळी डॉ.मिटकरी यांनी तातडीने सार्वजनिक उद्भव स्थानासह वितरण व्यवस्थेतील पाणी नमुने तपासणी करावी, तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने स्वच्छता, ॲबेटिंग करण्यावर भर द्यावा, असे सूचित केले. याशिवाय डेंग्यू संदर्भात संशयित रक्तनमुने तपासणी अहवाल तातडीने कसे मिळतील, याकडे लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.