तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उस्मानाबादकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे या भागातील रुग्णांची गैरसोय होत असून, ही रुग्णवाहिका सात दिवसांत तेरला परत पाठवावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन व सुभाष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
रुग्णवाहिकेअभावी येथील रुग्णांची गैरसोय होत असल्याने येथील रुग्णालयास शासकीय आरोग्य सेवेतून १ व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून १ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, यातील एक रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सकांनी उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयासाठी हस्तांतरित केली आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका येत्या सात दिवसांत परत पाठवावी. अन्यथा उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही देण्यात आल्या आहेत.