आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; पोलीस घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:15 IST2024-09-13T09:14:34+5:302024-09-13T09:15:16+5:30

धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या जवळील घरासमोर मध्यरात्री १२:३७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार करून पळ काढला.

Firing in front of Health Minister tanaji Sawants nephews house | आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; पोलीस घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू

आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; पोलीस घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू

सोनारी (जि.धाराशिव) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

आरोग्यमंत्री सावंत यांच्या परंडा मतदारसंघात गावभेटी सुरू आहेत. यादरम्यान नियमित वादंगाचे प्रसंग उद्भवत आहेत.  आरोप प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या जवळील घरासमोर गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार करून पळ काढल्याची माहिती येथील सुरक्षा रक्षकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व परंडा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी घटनेने खळबळ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी घटनास्थळापासून अवघ्या १२ किमी अंतरावरील परंडा येथे सभा होणार आहे. या सभेचे पूर्ण नियोजन धनंजय सावंत करीत आहेत. या सभेपूर्वी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.

Web Title: Firing in front of Health Minister tanaji Sawants nephews house