भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:26 IST2022-08-07T15:25:30+5:302022-08-07T15:26:02+5:30
उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती.

भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी
उस्मानाबाद : शहरात नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत जप्त केलेले लाखो रुपयांचे भंगार साहित्य नगर परिषदेतील कर्मचारी व एका ठेकेदाराच्या संगणमताने मुख्याधिकारी व उपमुख्याधिकाऱ्यांनी चोरुन नेल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य ॲड. अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती. यावेळी खोत म्हणाले, नगर परिषदेची कचरा विलगीरकरणासाठी ५ ते ७ टनाची कचरा विलगीकरण मशिन कचरा डेपो परिसरात होती. तसेच ४६ कचरा गाड्याचे फायर स्टेशनही भंगारात पडले होते. सध्या मशिन व भंगारातील साहित्य उपलब्ध नाही. २३ व २४ जुलै रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी न.प. हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत जप्त करण्यात आलेले लाखो रुपयांचे भंगाराचे साहित्य चोरीस गेले. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. मात्र, गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने पोलीस अधीक्षक व आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे मुख्याधिकारी, नगर परिषदेतील एक कर्मचारी व अज्ञात ठेकेदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. चोरी केलेल्या व्यक्तींची नावे अवगत असूनही ६ ऑगस्ट रोजी स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आल्याचे खोत म्हणाले. चोरीत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. खोत यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव मुन्ना शेख, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष राहुल माकोडे आदी उपस्थित होते.