'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:50 IST2025-09-25T17:49:25+5:302025-09-25T17:50:14+5:30
'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश
- संतोष वीर
भूम (धाराशिव ) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवारात पिके वाहून गेली, शेतात मातीऐवजी गोटे दिसू लागले, तर अनेक घरांत पाणी शिरून कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजी महाराजांनी तालुक्यातील मात्रेवाडी, माणकेश्वर, जावळा, शिरसाव आणि सावरगाव परिसराचा दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी प्रथम मात्रेवाडी येथे भेट दिली. येथे लक्ष्मण पवार या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झाल्याने कर्ज व ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली होती.यामुळे संभाजी महाराजांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या न ठेवता त्वरित मदत मिळाली पाहिजे, यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. यानंतर सावरगाव शिवाराची पाहणी करताना त्यांनी पाहिले की पावसाच्या पाण्याने सुपीक माती वाहून गेली असून शेतात मोठ्या प्रमाणात गोटे साचले आहेत. शेतकऱ्यांची शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असा कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, माणकेश्वर येथील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने तब्बल ५५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यात घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत. संभाजी महाराजांनी या कुटुंबांना धीर देत ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. गावोगाव झालेल्या नुकसानीला न्याय मदत मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वराज्य संघटनेचे नीलेश वीर,विठ्ठल बाराते, भाऊसाहेब कराळे, गणेश अंधारे,सागर गायकवाड, अभीशेख कराळे,तेजस अवताडे ,वैभव बागल,अरविंद हिवरे,ऋतिक वीर,अनिकेत आकरे यांच्या सह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.