"...तर फडणवीस, मोदी यांनाही किंमत मोजावी लागेल!"; मोर्चा रोखण्यावरून जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:15 IST2025-08-06T17:05:59+5:302025-08-06T17:15:01+5:30
जो पुढारी गावात थांबेल, त्याला पाडाच; मनोज जरांगे पाटील यांचे समाजास आवाहन

"...तर फडणवीस, मोदी यांनाही किंमत मोजावी लागेल!"; मोर्चा रोखण्यावरून जरांगेंचा इशारा
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मुंबईवर धडकणाऱ्या २९ ऑगस्टच्या मोर्चात ग्रामपंचायत सदस्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच सहभागी होण्यास सांगणार आहोत. जे येणार नाहीत, त्यांच्यावर आमचे लक्ष असणार आहे. जे इथेच गल्लीत थांबतील, त्यांना येत्या निवडणुकीत पाडाच, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी धाराशिव येथून केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईवर मोर्चा जाणार आहे. २७ ऑगस्टला आंतरवाली येथून हा मोर्चा रवाना होईल. या पार्श्वभूमीवर पाटील हे जिल्हानिहाय बैठका घेऊन समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. या बैठकांची सुरुवात त्यांनी मंगळवारी धाराशिव येथून केली. समाजातील प्रमुख व्यक्ती, समन्वयकांसोबत सकाळी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, मोर्चाचे स्वरुप समुद्रापेक्षा विराट असलेले पहायला मिळेल. आम्ही १०० टक्के जिंकणार आहोत. ओबीसी आरक्षण घेऊनच परत येणार. समाज बांधवांनी सण-वार करीत बसू नये. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे. यावेळी आरपारची लढाई आहे. विजय निश्चित मिळणार आहे. या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणीही संपर्कात नाही. आम्ही त्याची अपेक्षाही करीत नाही. मागच्या वेळी चर्चेत आरक्षणासाठी आधार हवा, असे सांगितले होते. आता ५८ लाख कुणबी नोंदणी सापडल्या आहेत. यापेक्षा मोठा आधार आणखी काय हवा? त्यामुळे आता आरक्षण द्यावेच लागेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना इशारा, मोर्चा रोखाल तर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर यावेळी पोलिसांच्या माध्यमातून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते महागात पडेल. ही धमकी नाही तर, सावध करतोय. मराठा समाजाने रौद्ररूप धारण केल्यास काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. केवळ फडणवीसच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यावेळी किंमत मोजावी लागेल. अगदी देशाच्या सत्तेलाही हादरा बसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.