Drought In Marathwada : मोठ्या आशेने पेरलेल्या रबी पिकांकडूनही निराशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:14 IST2018-10-25T12:11:27+5:302018-10-25T12:14:14+5:30

दुष्काळवाडा : रबीची पेरणी केली़ मात्र, उगवणच झाली नाही़ तूरही जळून जात आहे़ त्यामुळे लोहाऱ्यातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ 

Drought in Marathwada: The disappointment of rabi crops grown in large quantities | Drought In Marathwada : मोठ्या आशेने पेरलेल्या रबी पिकांकडूनही निराशा 

Drought In Marathwada : मोठ्या आशेने पेरलेल्या रबी पिकांकडूनही निराशा 

- बालाजी बिराजदार, लोहारा खुर्द, ता़ लोहारा, जि़ उस्मानाबाद

लोहारा शहरापासून चार कि.मी.अंतरावरील लोहारा खुर्दचे अख्खे शिवार पावसावरच अवलंबून आहे़ सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी दोन टप्प्यात पेरणी केली. पण, नंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने खरिपातून पेरणीचा खर्चही निघाला नाही. यानंतरही वरुणराजा बरसेल, या आशेवर रबीची पेरणी केली़ मात्र, उगवणच झाली नाही़ तूरही जळून जात आहे़ त्यामुळे लोहाऱ्यातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ 

१५४६ लोकसंख्येच्या लोहारा खुर्द गावचे अर्थकारणच शेतीवर आहे. त्यात दर दोन ते तीन वर्षाला अवर्षणाचा फेरा सुरू आहे़ त्यामुळे कर्जातून सावरण्याची संधीच येथील शेतकऱ्यांना मिळेना झाली़ यावर्षी पुन्हा दुष्काळ पडला़ खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके घेतली होती़ मात्र, पावसाने दोन वेळा दीर्घ खंड दिल्यामुळे अगदी पेरणीचाही खर्च खरिपातून निघालेला नाही़ सरासरीच्या अवघे ४० टक्केही उत्पन्न मिळाले नाही़ तरीही पुन्हा कर्ज काढून वरुणराजाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली़ मात्र, पाऊस गायब झाला अन् काळ्या मातीत पेरलेले बियाणे हरभरा, ज्वारी, करडीचा पेरा अक्षरश: वाया गेला आहे़ कर्जाचे काही तरी होईल, पण पोटापाण्याचे काय, असा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे़ त्यात पुन्हा ग्रामपंचायतीच्या सहा बोअरपैकी दोनच बोअर सुरू आहेत. तर आठ हातपंप केव्हाच बंद पडले आहेत. पाण्यासाठीही आतापासूनच भटकंती सुरू झाली़ हे चित्र आगामी काळातील दाहकता दर्शवीत आहे़ 

रबीची आशाच नाही 
लोहारा तालुक्यात खरिपाच्या उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असून, पाऊस नसल्याने रबी हंगामाची अजिबात आशा उरली नाही़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ 
- मिलिंद बिडबाग,     तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?

- साडेचार एक शेतीत सोयाबीन दोन बॅग व तूर पेरली़ सोयाबीनला पेरणी, खुरपणी व काढणीसाठी सरासरी वीस हजार रुपये खर्च आला, पण उत्पन्न मात्र तेरा हजार रुपयांचे निघाले आहे़ तुरीला आता फुलं आली आहेत. पण, पाऊस नसल्याचे ती गळून पडताहेत़ रान मोकळं कसं ठेवायचं म्हणून हरभरा पेरला तोही आता उगवला नाही़ - रुपाबाई आरगडे 

- माझ्या पाच एकर शेतीत एक हेक्टरमध्ये सोयाबीन घेतले होते़ एकूण खर्च वीस हजार व उत्पन्न सोळा हजार रुपयांचे झाले़ मेहनत तर वायाच गेली़ खर्चही निघाला नाही़ रबीवर आशा ठेवून ओल नसतानाही हरभरा पेरला़ त्याची उगवणच झाली नाही. आमची शेती पूर्णत: पावसावरच अवलंबून असल्याने आता भागवायचे कसे? - व्यंकट रसाळ 

- अवेळी व कमी पडलेल्या पावसामुळे खरिपाचे उत्पन्न ४० टक्के  झाले़ यामुळे आर्थिक गणित पूर्णपणे चुकले. रबीवर आशा होती, पण पाऊस झाला नाही. त्यामुळे रबीचे उत्पन्न काही येत नाही, हे माहीत असतानाही आशेवर दीड एकर ज्वारी पेरली़ बारा दिवस झाले तरी ती उगवली नाही़ त्यामुळे आता करायचे काय, खायचे काय, असा प्रश्न पडला आहे़ - श्रीहरी गाडवे 

- खरिपात सोयाबीन पेरले, पण खर्चही निघाला नाही. तूर पावसाअभावी वाळत चालली़ यामुळे शेतीकडे फिरकण्याचे मनही होईना़ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे? शासन नुसत्या घोषणा करीत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही. यावर्षीची आजची स्थिती पाहता पुढच्या भीषण दुष्काळाची धडकी भरत आहे़ - शेखर पाटील

- माझी शेती साडेपाच एकर आहे़ यात सोयाबीन, उडीद चार एकरावर घेतले़ पण खर्च व उत्पन्नाचा ताळमेळच बसला नाही़ अंगावरील कर्ज कायम राहिले़ रबीची थोडीफार आशा होती. हरभरा पेरला होता़ आता सात दिवस उलटले तरी तो उगवलाच नाही़ अशा परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय, हेच सुचेनासे झाले आहे़ - रवींद्र रसाळ 

Web Title: Drought in Marathwada: The disappointment of rabi crops grown in large quantities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.