जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणावर भर दिला जात आहे. ग्रामीण, तसेच शहरी भागात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लसींचा पुरवठा कमी होत असल्याने रोटेशन पद्धतीनेच केंद्रावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.
शनिवारी जिल्ह्यातील ११ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मुरूम, लोहारा, सास्तूर, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, उमरगा, परंडा, तुळजापूर, कळंब उपजिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस घेता येईल. पहिला डाेस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.