धाराशिवच्या 'मसाल्याचा' सातासमुद्रापार डंका! वाशीच्या लेकीने जागतिक बाजारपेठ केली काबीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:14 IST2026-01-28T19:13:36+5:302026-01-28T19:14:57+5:30

अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत धाराशिवच्या मसाल्याच्या चवीची जादू; , दररोज ७०० किलो मसालेची उत्पादन क्षमता, वार्षिक उलाढाल ३५ लाखांवर

Dharashiv's 'Masala' hits the world! How did Washi's Gita Bhandwale capture the global market? | धाराशिवच्या 'मसाल्याचा' सातासमुद्रापार डंका! वाशीच्या लेकीने जागतिक बाजारपेठ केली काबीज!

धाराशिवच्या 'मसाल्याचा' सातासमुद्रापार डंका! वाशीच्या लेकीने जागतिक बाजारपेठ केली काबीज!

- बाळासाहेब माने
धाराशिव :
जिद्द आणि कष्टाच्या जोरावर धाराशिवच्या गीता भांडवले यांनी जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून त्यांनी १० प्रकारचे मसाले उत्पादित करून अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरियापर्यंत पोहोचवले आहेत. नऊ अत्याधुनिक मशिनरींद्वारे दररोज ७०० किलो उत्पादनाची क्षमता त्यांनी निर्माण केली आहे. चोख व्यवस्थापन, गुणवत्ता आणि आकर्षक पॅकिंगमुळे त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५ लाख रुपयांवर पोहोचली असून, ग्रामीण महिलांसमोर त्यांनी नवा आदर्श ठेवला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत असंघटित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक साहाय्य देणारी केंद्रपुरस्कृत योजना आहे. या योजनेत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांना १० लाखापर्यंतच्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान मिळते. याच योजनेचा लाभ घेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील गीता भांडवले या महिलेने जागतिक बाजारपेठही काबीज केली आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी उत्पादित केलेले १० प्रकारचे मसाले आज धाराशिव, बीड, सोलापूर जिल्ह्यांसह अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या विकसित देशांतील स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचले आहेत. गुणवत्ता आणि वेळेत पुरवठा ही या व्यवसायाची सूत्रे आहेत. मागणी नोंदवल्यानंतर काही दिवसांतच आकर्षक पॅकिंगमध्ये माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. या चोख व्यवस्थापनामुळे आज या उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५ लाख रुपयांच्या घरात गेली आहे. एका बाजूला शेतीतील संकटांमुळे हतबलता व्यक्त केली जात असताना, गीता भांडवले यांनी कृषीपूरक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन नवे मॉडेल उभे केले आहे.

योजनेतून उभारले उद्योगाचे साम्राज्य
सुरुवातीला लहान स्तरावर काम करणाऱ्या गीता भांडवले यांनी शासनाच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत आर्थिक पाठबळ मिळवले. आज त्यांच्याकडे ९ अत्याधुनिक मशिनरी असून, त्याद्वारे दररोज ७०० किलो मसाला उत्पादन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांच्या या उद्योगात केवळ कुटुंबातील सदस्यच नाही, तर स्थानिक मजुरांनाही हक्काचा रोजगार मिळाला आहे.

जागतिक प्रदर्शनाने बदलले नशीब
२०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अन्न उद्योग प्रदर्शनात गीता भांडवले यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या मसाल्यांची अस्सल चव आणि गुणवत्ता पाहून परदेशी ग्राहक भारावून गेले. या प्रदर्शनामुळे त्यांना अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरिया येथून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, परदेशातील नागरिक आता स्वतःहून संपर्क साधून मसाल्यांची मागणी करत आहेत.

बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्न
केवळ उत्पादन करणे महत्त्वाचे नाही, तर त्याला योग्य मार्केटिंग आणि जागतिक बाजारपेठेची जोड देणे गरजेचे आहे. जागतिक अन्न उद्योग प्रदर्शनातून मिळालेली जागतिक बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- गीता भांडवले, महिला उद्योजक.

Web Title : धाराशिव के मसालों का विश्व में दबदबा, महिला उद्यमी ने जीता बाज़ार।

Web Summary : धाराशिव की गीता भांडवले ने अमेरिका, जर्मनी और दक्षिण कोरिया को मसाले निर्यात कर वैश्विक सफलता प्राप्त की। सरकारी योजनाओं और आधुनिक मशीनरी का उपयोग करके, उनके व्यवसाय का वार्षिक कारोबार ₹35 लाख है, जो ग्रामीण महिलाओं को प्रेरित करता है।

Web Title : Dharashiv's spices impress globally, woman entrepreneur conquers international market.

Web Summary : Geeta Bhandvale from Dharashiv achieved global success by exporting spices to America, Germany, and South Korea. Utilizing government schemes and modern machinery, her business boasts a ₹35 lakh annual turnover, inspiring rural women.