धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:15 IST2025-09-23T12:12:27+5:302025-09-23T12:15:52+5:30
धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला.

धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू
धाराशिव : दररोज होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. रविवार व सोमवारच्या रात्रीतून पावसाने कहर केला. जिल्ह्यातील तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेषत: भूम व परंडा तालुक्यातील सर्वच मंडळांत १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावे, शेतवस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या. परिणामी, अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर व बोटीचा वापर करावा लागला.
धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परंडा तालुक्यातील सीना, खासापुरी, चांदणी प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सीना, खैरी, नळी, दुधना, सोनगिरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचे पाणी परंडा तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके अन् मातीही वाहून गेली असून, अद्याप अनेक शिवारात पिके पूर्णत: पाण्याखाली बुडाली आहेत.
२२ मंडळांमध्ये अतिवृष्टी
धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला. येथील दहाही मंडळांमध्ये १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस आहे. शिवाय, उमरगा तालुक्यातही सहापैकी ५ मंडळांत अतिवृष्टी नोंदली आहे.
हेलिकॉप्टरने ६० नागरिकांना काढले
पुरात परंडा तालुक्यातील लाखी बुकी, चौघरी वस्ती, नरसाळे वस्ती, वाघेगव्हाण, देवगावसह इतरही काही वस्त्यांवर नागरिक अडकून पडले होते. नाशिक येथून बोलावलेल्या हेलिकॉप्टरद्वारे सुमारे ६० नागरिकांना बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.
पुराच्या लोंढ्याने घेतला जीव
भूम तालुक्यातील चिंचोली येथील देवना नवनाथ वारे (७०) या रविवारी रात्री शेतातील शेडमध्ये झोपल्या होत्या. रात्रीतून लगतच्या ओढ्याला पूर आला. देवनाबाई झोपेतच असताना पुराचा एक लोंढा शेडमध्ये शिरला व त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
बांधलेल्या अवस्थेतील जनावरे दगावली
भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या अवस्थेतील १६ गाई बुडून जागेवरच मृत्यू पावल्या. या गावात एकूण ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली आहे. परंडा तालुक्यातही शेकडो जनावरे वाहून गेली आहेत.
एनडीआरएफ, आर्मी तैनात
परंडा तालुक्यात पावसाने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. पुढचे काही दिवस आणखी जोरदार पावसाचे असतील, असे हवामान विभागाने अलर्ट दिल्याने परंड्यात एनडीआरएफ, सैन्यदलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.