Dharashiv: 'पुराने जमीनही नेली आणि कर्ता पुरुषही'; चार दिवसांनी सापडला तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:36 IST2025-09-26T15:32:48+5:302025-09-26T15:36:02+5:30
पूर ओसरला, पण दु:खाचा डोंगर कायम; तब्बल ३२ किमी अंतरावर सापडला मृतदेह, भूम तालुक्यातील तांबे कुटुंबावर कोसळला आघात

Dharashiv: 'पुराने जमीनही नेली आणि कर्ता पुरुषही'; चार दिवसांनी सापडला तरुणाचा मृतदेह
- संतोष वीर
भूम ( धाराशिव ) : तालुक्यातील देवळाली येथील गणेश तांबे (३८) हा युवक मंगळवारी ( दि. २३) पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. चार दिवसानंतर आज तब्बल ३२ किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून सापडला आहे.
तालुक्यात दिनाक २२ सप्टेंबर रोजी रात्रभर पाऊस झाला होता. यामुळे देवळाली भागात पूर आला होता. या पुराच्या पाण्यात गणेश तांबे हा युवक सायंकाळी देवळाली गावातून घराकडे जात असताना वाहून गेला होता. या घटनेनंतर एनडीआरएफ टीमने तत्काळ दोन किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यांची चिंता वाढली होती.
दरम्यान, आज सकाळी असू गावातील शेतकरी समाधान मासाळ हे विहिरीजवळील शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठी एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ गावात माहिती दिली. गावातील एक महिला देवळाली येथील असल्याने तिने ही बाब गणेशचे मामा बाबासाहेब ढगे (चिंचपूर ढगे) यांना कळवली. ढगे यांनी तत्काळ देवळाली येथे माहिती दिली. त्यानंतर तातडीने सरपंच विशाल ढगे व फिरोज खान यांनी गावातील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या हातातील दोरा, राखी, चेहरा आणि उंचीच्या आधारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर गणेश तांबे यांचे पार्थिव देवळाली येथे नेण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
जमीनही वाहून गेली
पुराच्या तडाख्यात तांबे कुटुंबाची दोन एकर पैकी एक एकर जमीन वाहून गेली आहे. यात सोयाबीन पीक होते. एकीकडे जमिनीचे अतोनात नुकसान झालेले असताना दुसरीकडे घरातील कर्ता पुरुषही गेल्याने तांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.