माणुसकीला सलाम! शेजाऱ्याचे पीक वाचवताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:23 IST2026-03-09T13:22:42+5:302026-03-09T13:23:17+5:30
शेजाऱ्याच्या पीक वाचवताना वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; तडवळा परिसरात शोककळा

माणुसकीला सलाम! शेजाऱ्याचे पीक वाचवताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
तुळजापूर (जि. धाराशिव) : स्वतःच्या शेतातील वाळलेले गवत जाळताना लागलेली आग शेजारील शेतातील उभ्या ज्वारीच्या पिकात पसरू नये, या उदात्त हेतूने आग शमविण्याचा प्रयत्न करताना गंभीररीत्या भाजलेल्या तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ७५ वर्षीय वृद्ध शेतकरी भरत दासाराव रोचकरी यांचा पाच दिवसांच्या उपचारानंतर रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नेहमीप्रमाणे भरत रोचकरी हे तडवळा शिवारातील आपल्या शेतात स्वच्छतेच्या कामासाठी गेले होते. मशागतीचा भाग म्हणून त्यांनी जमा केलेले वाळलेले गवत पेटवून दिले. मात्र, वाळलेल्या गवतामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे आगीने अचानक रौद्ररूप धारण केले. ही आग शेजारील शेतातील कापणीला आलेल्या ज्वारीच्या पिकाकडे वेगाने पसरू लागली. शेजाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ७५ वर्षांच्या रोचकरी यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली. मात्र, आगीच्या ज्वाळांनी त्यांना चहूबाजूंनी वेढल्याने ते गंभीररीत्या भाजले गेले.
काही वेळानंतर शेजारील शेतकऱ्याचा बटाईदार शेतात आला असता, रोचकरी हे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना व कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांना प्रथम तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात व प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने लातूर आणि त्यानंतर धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. एक शांत आणि कष्टाळू शेतकरी म्हणून ओळख असलेल्या रोचकरी यांच्या निधनाने तडवळा परिसरात शोककळा पसरली आहे.