Dharashiv Rain: अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं! आता काय खाऊ आणि मुलांना कसं शिकवू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:00 IST2025-09-25T16:48:55+5:302025-09-25T17:00:54+5:30
थोडा वापसा झाल्यावर अर्धा एकर पेरलं, तेही सप्टेंबरच्या अतिवृष्टीनं हातचं घालवलं. सांगा, आता काय खाऊ अन् मुलांना कसं शिकवू?

Dharashiv Rain: अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं! आता काय खाऊ आणि मुलांना कसं शिकवू?
- बालाजी आडसूळ
कळंब : शेत फक्त ९० गुंठे, त्यावरच चार व्यक्तींचा प्रपंच बेतलेला. पैकी मुलगा अन् मुलगी इंजिनिअरिंगला. शिक्षण, दवाखाना अन् संसारातील तेलमीठ असा सगळा भार त्या अत्यल्प जमिनीच्या तुकड्यावरच! मात्र, त्या वावराचे मे महिन्यातच अतिवृष्टीनं सरोवर झालं. थोडा वापसा झाल्यावर अर्धा एकर पेरलं, तेही सप्टेंबरच्या अतिवृष्टीनं हातचं घालवलं. सांगा, आता काय खाऊ अन् मुलांना कसं शिकवू?
कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथील संपत मच्छिंद्र खोचरे या ५५ वर्षीय शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न बोलती बंद करणारा, तितकाच संवेदनशील मनाला चटका लावणारा. खोचरे यांच्या कुटुंबात चार व्यक्ती, इटकूर महसुली हद्दीत त्यांना मात्र ९० गुंठे जमीन. मुलगा वैभव आयटीआय केल्यानंतर आता अभियांत्रिकीची पदविका घेतोय. मुलगी पुण्यात इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकतेय. संपत ऊर्फ बापूराव यांच्यामागे दवाखाना लागलेला. महिन्याकाठी तिनेक हजार त्याचा खर्च. परत खाण्यापिण्याचा, कपडालत्त्याचा अन् मुलांच्या शिक्षणाचा भारही याच जमिनीतील उत्पन्नावर अवलंबून. यामुळे ते अनुकूल निसर्ग, पिकलेलं शेत अन् चांगल्या दरात विकलेला शेतमाल या बाबी त्यांच्यासाठी ‘जीवनावश्यक’ अशाच.
काय खाऊ, कसं शिकवू..?
मुलगी इंजिनिअरिंगला. तिच्या प्रवेश व हॉस्टेलसाठी बचतगटाचे कर्ज काढले, खासगी देणं केलं अन् कसातरी प्रवेश घेतला. मुलगा पॉलिटेक्निक करतोय. यांच्या शिक्षणाचा प्रश्न तर दूरच; पण एक ‘चिपटं’ही माल हाती येणार नसेल तर वर्षभर खत - औषधी-बियाणांची देणी कशी देऊ, खाण्यापिण्याच्या गरजा कशा भागवू, दवाखान्याचा खर्च कसा भागवू? अशा एक ना अनेक प्रश्नांची ‘जंत्री’ कोण सोडवणार? ही संपत खोचरे यांनी सांगितलेली आपबिती ह्रदयस्पर्शी अशीच.