२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:46 IST2025-09-24T19:45:32+5:302025-09-24T19:46:03+5:30

Dharashiv Rain : एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं.

Dharashiv Rain: 25 years of hard work washed away in an instant; 42 cows and calves died, a mountain of grief for the cattle breeder of Bhoom | २५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

संतोष वीर/भूम (जि. धाराशिव) : काळ बनून काळरात्री बरसलेल्या पावसाने हजारो शेतकऱ्यांना उघड्यावर आणले आहे. पिंपळगावचे दातखिळे कुटुंबही यापैकीच एक. २५ वर्षांपूर्वी एक गाय आणून जोडव्यवसाय सुरू केला. अखंड मेहनतीने २५ वर्षांनी शेकडो पशुधनाची जंत्री उभी केली. गोठा मोठा केला. पोल्ट्री केली. यासाठी केलेला संघर्ष व कष्ट मात्र अवघ्या २५ मिनिटांत पुरामध्ये वाहून गेले. आता उरलाय तो दाटलेला हुंदका अन् गायीविना पोरका झालेला तो गोठा.

बालाघाटच्या डोंगररांगांत वसलेले भूम. माळरानामुळे शेती आवाक्याबाहेरची. म्हणून पशुपालनावर उपजीविका भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या येथे मोठी. पिंपळगाव येथील शेतकरी आत्माराम भानुदास दातखिळे हेही यापैकीच एक. शेतीवर भागत नसल्याने २५ वर्षांपूर्वी त्यांनी एक गाय आणली. दुधातून पदरी पडलेले पै-पै जोडून दुसरी गाय घेतली. याच पद्धतीने पशुधन जोडत त्यांनी आता ६७ गायी केल्या होत्या. त्यांच्यासाठी मोठा गोठा बांधला. त्यांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे २० शेळ्या, १०० कोंबड्याही आणल्या. हे सारं उभं करण्यासाठी आयुष्याची २५ वर्षे खर्ची घातली.

दरम्यान, रविवार व सोमवारच्या रात्री पडलेल्या जोरदार पावसाने त्यांच्या गोठ्याच्या वरील बाजूस बाणगंगा व रामगंगा नद्यांचा संगम होऊन पाण्याचा मोठा लोंढा तयार झाला. अवघ्या २५ ते ३० मिनिटांत हा लोंढा दातखिळे यांच्या शेतात, गोठ्यात शिरला. बांधलेल्या गायींना सोडण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे १७ गायी जागेवरच दगावल्या. १० गायी वाहून गेल्या. २० शेळ्या, १५ वासरे, १०० कोंबड्या, ४०० बॅग खुराक हे सारं काही डोळ्यांदेखत संपलं. २५ वर्षे अविरत कष्ट घेऊन लेकरांसारखं जपलेल्या पशुधनाचा बळी गेलाय, हे आत्माराम दातखिळे यांचे मन अजूनही मानायला तयार नाही.

घरातही घातला पुराने धुमाकूळ
दातखिळे यांच्या घरातही पुराचे पाणी शिरल्याने सारा संसारही नष्ट झाला. पिके, कृषी औजारे, धान्य सगळ्यांची नासाडी झाली. कणा नव्हे, अख्खा माणूस मोडून पडला. त्यामुळे सरपंच झिनत सय्यद यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांना धीर देत जमेल तशी मदत देण्यास सुरुवात केली आहे.

पुराचा पुन्हा लोंढा, मृत गायीही गेल्या वाहून...
बांधलेल्या अवस्थेत मृत झालेल्या गायींच्या अंत्यसंस्कारासाठी दातखिळे यांनी शेतातच मोठा खड्डा घेतला होता. ट्रॅक्टर आणले होते. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सोमवारी रात्री पुन्हा पूर आला व त्यात मृत गायी वाहून गेल्या.

आता सगळंच संपलं
एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं. त्यांच्यावरच आमचं घर चालायचं; पण आता सगळंच संपलं. ५० लाखांचं नुकसान झालंय. कसं उभं राहायचं, हा प्रश्न डोक्यावर दगडासारखा आदळतोय.
- आत्माराम दातखिळे, पशुपालक

English summary :
A Maharashtra farmer's 25 years of hard work vanished as floods killed 42 cattle. Atmaram Datkhile lost livestock, crops, and his home in the deluge, facing a 50 lakh loss. Villagers offer support.

Web Title: Dharashiv Rain: 25 years of hard work washed away in an instant; 42 cows and calves died, a mountain of grief for the cattle breeder of Bhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.