धाराशिव राजकीय भूकंप: तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा 'रामराम'; सहकुटुंब भाजप प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:30 IST2026-03-19T13:29:21+5:302026-03-19T13:30:42+5:30
धाराशिवमध्ये मोठी खळबळ; सावंतांच्या वाड्यात राजकीय ठिणगी; धनंजय सावंतांनी सोडला 'धनुष्यबाण', हाती घेतले 'कमळ'

धाराशिव राजकीय भूकंप: तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा 'रामराम'; सहकुटुंब भाजप प्रवेश
धाराशिव : राजकीय आखाड्यात रक्ताच्या नात्यांपेक्षा सत्तेची समीकरणं वरचढ ठरतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा धाराशिवमध्ये आला आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांच्या राजकीय साम्राज्याला खुद्द त्यांच्याच पुतण्याने, जि.प.चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी भगदाड पाडले आहे. बुधवारी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या सोहळ्यात धनंजय सावंतांनी सहकुटुंब 'कमळ' हाती घेत, काका तानाजी सावंतांना जोरदार 'राजकीय दे धक्का' दिला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणातच या वादाची नांदी झाली होती. जवळा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटत धनंजय सावंतांनी अपक्ष शड्डू ठोकला होता. भाजपनेही हीच 'संधी' साधत तानाजी सावंतांना कोंडीत पकडण्यासाठी धनंजय यांना रसद पुरवली. निकाल लागला आणि धनंजय सावंतांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठत होत्या, ज्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत सदस्य धनंजय सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नी सखीताई धनंजय सावंत, मुलगा आणि मुलगी यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्यासोबतच भूमचे युवासेना तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण आणि माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके, माजी सभापती दत्तात्रय माेहिते, यांसारख्या विश्वासू शिलेदारांनीही 'धनुष्यबाण' सोडून धनंजय यांच्या पाठोपाठ 'कमळ' हाती धरले आहे. या पक्षप्रवेश साेहळ्यास जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.
'विकासाला ब्रेक, म्हणून आमचा टेक!'
"भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील विकासाचा गाडा रुतला आहे. कार्यकर्त्यांना डावलले जात असून सत्तेचा फायदा तळागाळातील माणसाला मिळत नाहीये. भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्यानेच आम्ही हा मोठा निर्णय घेतला आहे," अशा बोचऱ्या शब्दांत धनंजय सावंतांनी आपल्याच काकांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
सोशल मीडियावरून 'स्टेटस' वॉर
मुंबईत भाजपचा झेंडा खांद्यावर घेताच धनंजय सावंतांनी आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाईल आणि स्टेटसमध्येही बदल केला. त्यांच्या बदललेल्या 'डिजिटल' अवताराने धाराशिवच्या राजकारणात भविष्यात येणाऱ्या वादळाचे संकेत दिले आहेत. आता या पुतण्याच्या बंडखोरीला 'काका' तानाजी सावंत कसे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.