मदत नव्हे कर्तव्य! पुरात बुडालेली शाळा NSS स्वयंसेवकांनी केली स्वच्छ; शैक्षणिक साहित्यही वाटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:43 IST2025-09-26T14:41:48+5:302025-09-26T14:43:34+5:30
भूममध्ये पूरग्रस्त साडेसांगवी गावातील शाळा एन.एस.एस.च्या मदतीने पुन्हा सुरू; 'पुराच्या संकटात खरी सामाजिक सेवा', गावकऱ्यांच्या भावना

मदत नव्हे कर्तव्य! पुरात बुडालेली शाळा NSS स्वयंसेवकांनी केली स्वच्छ; शैक्षणिक साहित्यही वाटले
- संतोष वीर
भूम ( धाराशिव) : तालुक्यातील साडेसांगवी गावात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील घरे, शेती तसेच शाळा पाण्याखाली आले. या पार्श्वभूमीवर भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने गुरुवारी ( दि. २५) गावात विशेष मदत व स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
“मदत नव्हे कर्तव्य” या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी श्रमदान, स्वच्छता, शालेय साहित्य व खाऊ वाटप, तसेच पूरग्रस्त महिलांना व मुलांना कपडे वाटप केले. अतिवृष्टी दरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने सर्व वर्ग खोल्या व शालेय साहित्य चिखलात गेले होते. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एन.एस.एस. स्वयंसेवकांनी सर्व वर्गखोल्या व साहित्य स्वच्छ करून परिसराची साफसफाई केली.
पूराच्या पाण्यात विद्यार्थ्यांची दप्तरं, पुस्तके, वह्या वाहून गेली होती. त्यामुळे एकूण ७० विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल व जेवणाचे डबे देण्यात आले. नवीन शालेय साहित्य हातात मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी संस्थेचे उपसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, प्रा. डॉ. तानाजी बोराडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गंगाधर काळे, डॉ. नितीन पडवळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
गावकऱ्यांनी केले स्वागत
गावकऱ्यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “पुराच्या संकटात आम्हाला आधार व धीर देणारे हे कार्य म्हणजे खरी सामाजिक सेवा आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
ही आपली जबाबदारी
समाजाप्रती असलेले कर्तव्य ओळखून आमचे एन.एस.एस. स्वयंसेवक पुढे सरसावले. गावातील शाळा, विद्यार्थी व पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणे ही फक्त मदत नसून आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी मनापासून घेतलेली मेहनत पाहून आम्हाला अभिमान वाटतो.
- डॉ. संतोष शिंदे, प्राचार्य