'मुकादमाच्या छळाने कुटुंबाचा आधार गेला!'; पैशांवरून वादाने ऊसतोड कामगाराने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:02 IST2026-03-13T13:02:26+5:302026-03-13T13:02:37+5:30
याप्रकरणी भूम पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

'मुकादमाच्या छळाने कुटुंबाचा आधार गेला!'; पैशांवरून वादाने ऊसतोड कामगाराने संपवलं जीवन
भूम (जि. धाराशिव): ऊसतोडीसाठी घेतलेल्या उचल पैशांच्या परताव्यावरून झालेल्या अमानुष मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून, उळूप येथील ४२ वर्षीय कामगाराने आपली जीवनयात्रा संपवली. रणजीत सर्जेराव सानप असे या दुर्दैवी कामगाराचे नाव असून, याप्रकरणी भूम पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वसुलीसाठी अमानुष छळ
मयत रणजीत सानप यांनी ऊसतोडीच्या कामासाठी काही पैसे उचल म्हणून घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी रामेश्वर येथील औदुंबर ऊर्फ पिनू विष्णू दराडे याने त्यांच्याकडे तगादा लावला होता. ११ मार्च रोजी आरोपीने सानप यांना रामेश्वर येथे बोलावून घेतले आणि तिथेच त्यांना डांबून ठेवले. पैसे वेळेत मिळाले नाहीत म्हणून त्यांना शारीरिक मारहाण करून त्यांचा प्रचंड मानसिक छळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
झाडाला घेतला गळफास
आरोपीकडून होणाऱ्या सततच्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून रणजीत सानप यांनी टोकाचे पाऊल उचलले. १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास, बरहाणपूर शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
गुरुवारी दुपारी मयत सानप यांचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. "जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही," अशी भूमिका घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. भूम पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.