पैसे गेले कुठे? ७० लाख खर्चूनही भूमकर तहानलेलेच; पहाटे मोटार जळाली अन् 'पाणी' पेटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:59 IST2026-02-28T18:54:18+5:302026-02-28T18:59:30+5:30

भूम पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७० हजार नागरिकांना

Dharashiv News: Bhum Water Supply Crisis: Motor Not Repaired for 5 Years Despite Rs 70 Lakh Expenditure | पैसे गेले कुठे? ७० लाख खर्चूनही भूमकर तहानलेलेच; पहाटे मोटार जळाली अन् 'पाणी' पेटलं!

पैसे गेले कुठे? ७० लाख खर्चूनही भूमकर तहानलेलेच; पहाटे मोटार जळाली अन् 'पाणी' पेटलं!

भूम (जि. धाराशिव): प्रशासकीय काळात पाणीपुरवठा विभागावर ७० लाख ३९ हजार ६२ रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात असतानाच, शहरातील दुसरी मोटार गेली पाच वर्षे दुरुस्त न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता सुरू असलेल्या एकमेव मोटारीत अचानक बिघाड झाल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या घटनेने पालिकेच्या ७० लाखांच्या खर्चावर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगरसेवकांचा तलावावर ठिय्या
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती नवनाथ रोकडे, गटनेते रुपेश शेंडगे, नगरसेवक आबासाहेब मस्कर आणि चंद्रमणी गायकवाड यांनी वंजारवाडी तलावावरील जॅकवेलवर धाव घेतली. यावेळी आबासाहेब मस्कर यांनी प्रशासकीय काळात अर्थसंकल्पातून पाणीपुरवठ्यावर झालेल्या खर्चाचा हिशोबच वाचून दाखवला. ७० लाख खर्चूनही पर्यायी मोटार सक्षम का नाही? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

बिलासाठी मेकॅनिकची टाळाटाळ
धक्कादायक बाब म्हणजे, देखभाल करणाऱ्या मेकॅनिकचे १ लाख ४० हजार रुपयांचे बिल प्रलंबित असल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी येण्यास सुरुवातीला नकार दिला होता. अखेर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. यावरून पालिकेच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षांवर टीकेची झोड
"शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना नगराध्यक्ष घटनास्थळी फिरकले नाहीत. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रथम नागरिक दुर्लक्ष करत आहेत," असा आरोप गटनेते रुपेश शेंडगे यांनी केला आहे. १ मार्चपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असले, तरी या विषयावरून भूममध्ये आता राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title: Dharashiv News: Bhum Water Supply Crisis: Motor Not Repaired for 5 Years Despite Rs 70 Lakh Expenditure