Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:44 IST2025-09-30T19:40:14+5:302025-09-30T19:44:10+5:30
'तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे'; भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी

Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली!
- संतोष वीर
भूम (धाराशिव): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असताना, प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत अपुरी आणि 'जखमेवर मीठ चोळल्यासारखी' असल्याची तीव्र नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दौरा करूनही मदतीच्या निकषांमुळे अनेक कुटुंबांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यात नदीकाठी असलेल्या ७१२ घरांमध्ये पुराचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या सर्व कुटुंबांसाठी प्रशासनाने एकत्रितपणे केवळ ५ लाख ८० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही तुटपुंजी मदत पाहता, 'ही काय चेष्टा आहे?' असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. यासह तालुक्यातील इतर १५ शेतकऱ्यांच्या २६ जनावरांच्या मृत्यूसाठी ९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
२५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची
मदतीच्या निकषांमुळे झालेल्या अन्यायाचे एक गंभीर उदाहरण म्हणजे पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांचे कुटुंब. दातखिळे कुटुंबाच्या गोठ्यातील १७ गाई जागीच मयत झाल्या होत्या, तर १० गाई पुरात वाहून गेल्या होत्या. ट्रॅक्टर आणि शेतीचे अवजारे धरून त्यांचे एकूण २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासनाच्या निकषांनुसार, केवळ ६ गाई वाहून गेल्याची आणि मयत झाल्याची मदत म्हणून त्यांना जास्तीत जास्त २ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. शेतकरी आत्माराम दातखिळे यांनी या मदतीवर तीव्र असंतोष व्यक्त करताना म्हटले, "आमच्या २२ जनावरांची जिओ टॅगिंग झाली असताना केवळ ६ गाईची भरपाई दिली आहे. ही मदत म्हणजे सरकारने आमची थट्टा केल्यासारखे आहे."
सरकारच्या निकषांप्रमाणे मदत
या संदर्भात तहसीलदार जयवंत पाटील यांनी, "सध्या सरकारच्या निकषांप्रमाणे जेवढी शक्य आहे तेवढी मदत दिली आहे. सरकारने भविष्यात निकष बदलल्यास त्या पद्धतीने वाढीव मदत दिली जाईल," असे स्पष्ट केले आहे.
निकष बदलून मदत द्या
शेतकऱ्यांनी आता राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाईचे निकष बदलून जास्तीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी वर्गात असंतोष वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.