Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:45 IST2025-09-23T17:42:57+5:302025-09-23T17:45:49+5:30
भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त
- संतोष वीर
भूम (धाराशिव) : तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या पाचही मंडळांतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. नदीकाठची हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली. ७०२ हेक्टर शेती तर खरडून वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना जीव वाचवण्यात यश आले तरी “आता पुढे जगायचे कसे?” हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन सतत चिंतेच्या विचाराने उभा राहत आहे.
दिनाक २२ रोजी रामगंगा व बाणगंगा नद्यांनी रात्रभर धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंचपूरजवळील तब्बल ५०० मीटर रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याच परिसरात शेतात राहत असलेले भारत रामभाऊ मोरे यांच्या घरातही पुराचे पाणी घुसले. यामुळे रात्रीच्या अंधारात कुटुंबातील सात सदस्य थरथरत होते. जीव वाचवण्यासाठी मोरे यांचा मुलगा गणेश यांनी पोटच्या दोन लहान मुलांना तासभर खांद्यावर घेऊन उभे राहिले. घरात पाणी प्रवाहाने शिरू नये म्हणून गणेश मोरे यांनी दरवाजा लावला होता. यामुळे दरवाज्याला पाणी थापून घरात काही प्रमाणात पाणी कमी येत होते. परंतु गावकऱ्यांनी मोरे यांना पाण्याचा प्रवाह वाढत आल्याने बाहेर निघा असे सांगितल्याने. मोरे यांनी घरा समोर वाहत आलेल्या लिंबाच्या झाडांचा आधार घेत वाट काढली. धाडसाने त्यांनी घरातील ७ सदस्यांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. यामुळे थोडक्यात दुर्घटना टळली. मात्र, मोरे परिवार हे शेतीवर आधारित असल्याने त्यांचे पुढचे आयुष्य पूर्णतः थांबले आहे. मोरे यांची ३ एकर २० गुंटे शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली. यामध्ये तब्बल २ एकर द्राक्षबाग पूर्णपणे वाहून गेली, तर उर्वरित जमिनीवरील खरीप पिकेही पूर्णतः नष्ट झाली. आयुष्यभराचा घाम आणि परिश्रम क्षणात वाहून गेल्याने मोरे हतबल झाले आहेत.
“जीव वाचला खरी, पण आता शेती नाही, बाग नाही, कमाई नाही. बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंब कसे चालवायचे?” अशा प्रश्नांनी मोरे यांचे मनोबल खचले असून त्यांनी डोक्याला हात लावून वाहून गेलेल्या शेती कडे पाहत टाहो फोडला आहे. या आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटून आले आहेत. शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत केली नाही तर भूम तालुक्यातील शेतकरी पुनर्वसनाऐवजी उद्ध्वस्तच होतील, अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
१४५ जनावरे दगावली, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान
तालुक्यात झालेली अतिवृष्टीने नदीकाठी राहत असलेल्या नागरी वस्ती व जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने २ दिवसात १४५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये काही वाहून गेली तर काही जाग्यावरच दगावली आहेत. ३०७ घरांची परझड झाली आहे. तर तब्बल ७०२ हेक्टर शेती खरडून वाहून गेली असून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. अशी माहिती तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आहे. ज्या शेतीवर पूर्ण परिवार अवलंबून आहे. ती शेतीच खरडून वाहून गेल्याने ती पुन्हा कशी तयार करायची व कसायची या चिंतेने मी हातबल झालो आहे भारत मोरे चिंचपूर येथील शेतकरी