भूम तालुक्यात १७ गायी गोठ्यातच दगावल्या, ८७ जनावरे वाहून गेली; शेतीही खरडून निघाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST2025-09-22T19:07:01+5:302025-09-22T19:08:36+5:30
अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले

भूम तालुक्यात १७ गायी गोठ्यातच दगावल्या, ८७ जनावरे वाहून गेली; शेतीही खरडून निघाली
- संतोष वीर
भूम ( धाराशिव) : तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये २१ सप्टेंबर अतिवृष्टीची नोंद झाली. यात शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली व रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. यामध्ये आंबी मंडळात १०९ मिमी, माणकेश्वर १०३ मिमी, भूम १३२ मिमी, वालवड १०९ मिमी तर ईट मंडळात ७५ मिमी इतकी नोंद झाली असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
दरम्यान शहरात तब्बल १३२ मिमी पाऊस झाला. यामुळे शहरातील सर्वच नाले ओसंडून वाहू लागले. यामध्ये शहरातील संजय साबळे यांच्या कृषी दुकानात नाल्यातील पाणी प्रवाहाने घुसले. त्यामुळे दुकानातील खते व औषधे पाण्यात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यासह तालुक्याच्या सीमेवरील अंतरगाव येथे बाणगंगा नदीला मोठा पूर आला. व नदी पात्राने नदी पात्र सोडून गावात शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांची घरे, शेतजमिनी व जनावरे याचे अतोनात नुकसान झाले. तब्बल अंतरगाव येथील ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून यातील पिके वाया गेली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे ५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. १०५ घरांचे नुकसान झाले आहे व १२ जनावरे वाहून गेली आहेत.
पिंपळगाव येथे विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील १७ गायी जागीच दगावल्या, १५ वासरे व १० गाई वाहून गेली तर पशुखाद्याचे २२ पोते पाण्यात वाहून गेले व गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हिवर्डा येथे पाझर तलाव फुटल्याने २० ते २५ एकर जमीन पाण्यात गेली आहे.पाथरूड येथे ६ घरांची पडझड होऊन १ जनावर दगावले आहे. अंजनसोंडा येथे ३ घरांची पडझड झाली आहे. देवांग्रा येथे १ जनावर दगावले आहे. सुनगिरी येथे तीन घरांची पडझड होऊन तब्बल २० हेक्टर शेती खरडून गेली आहे. बेलगाव पिंपळगाव येथेही पूरामुळे जनावरे वाहून गेली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात तब्बल ८७ जनावरे वाहून व दगावली असल्याची नोंद झाली असल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान देखील झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तातडीने प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.