Dharashiv: कर्ज, अतिवृष्टीच्या दुहेरी संकटाने खचलेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:34 IST2025-10-08T19:33:29+5:302025-10-08T19:34:22+5:30
तरुण शेतकऱ्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे

Dharashiv: कर्ज, अतिवृष्टीच्या दुहेरी संकटाने खचलेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!
तामलवाडी (जि. धाराशिव) : बँकेचे कर्ज आणि निसर्गाचा क्रूर लहरीपणा या दुहेरी संकटाने पिचलेल्या एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली.
सोमनाथ दिलीप काटमोरे (वय २५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमनाथ यांच्याकडे कुटुंबाची १२ एकर जमीन होती आणि त्यांनी शेतीसाठी बँकेचे कर्जही घेतले होते. यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला पीक जोमदार आले; पण ऐनवेळी झालेल्या अतिवृष्टीने सर्व होत्याचे नव्हते केले. शेतात पीक कमी आणि गवतच जास्त उगवल्याने मोठी नापिकी होणार, हे स्पष्ट झाले होते. कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, या विवंचनेत सोमनाथ पूर्णपणे खचले होते.
बुधवारी याच पिकाची काढणी करून मळणी करायची होती आणि मोठा भाऊ मळणी यंत्राची तयारी करीत असतानाच, नैराश्यातून सोमनाथ यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सोमनाथ यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबातील एका आधाराचा खांब कोसळला आहे. या घटनेची नोंद तामलवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.