Dharashiv: कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:31 IST2025-10-06T12:31:21+5:302025-10-06T12:31:44+5:30
भूम तालुक्यात १२ दिवसांत दुसऱ्या शेतकऱ्याने जीवन संपवल्याने शेतकरी चिंतेत

Dharashiv: कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन
- संतोष वीर
भूम (धाराशिव) : तालुक्यातील हिवरा येथील एका अल्पभूधारक शेतकाऱ्याने कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या हानीचा ताण सहन न झाल्याने शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी ( दि. ६ ) पहाटे घडली. बंडू वसुदेव जगदाळे (३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मागील १२ दिवसांत २ शेतकऱ्याने जीवन संपवल्याच्या घटनेने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
काही महिन्यांपूर्वी वडिलांच्या उपचारासाठी बंडू जगदाळे यांनी खाजगी सावकाराकडून दोन लाख रुपये घेतले होते. मात्र, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. यासोबतच बँकेचे पिककर्ज व कुटुंबाची जबाबदारी यामुळे जगदाळे प्रचंड मानसिक ताणाखाली होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाचा धडाका सुरू आहे. यामुळे खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये जगदाळे यांच्या दीड एकर शेतातील सोयाबीनचे पीकही पाण्याखाली जाऊन पूर्णपणे वाया गेले होते. यामुळे जगदाळे निराश होते. यातूनच वडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणाला काही दिवस बाकी असताना त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. जगदाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई असा परिवार आहे. प्रशासनाने तातडीने जगदाळे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
१२ दिवसांत दोघांनी संपवले जीवन
दरम्यान, अतिवृष्टीने नदीकाठी असलेल्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाल्याने निराश झालेल्या आणि ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तालुक्यातील मात्रेवाडी येथील लक्ष्मण पवार यांनी दिनाक २४ सप्टेंबर रोजी जीवन संपवले होते. तर सोमवारी पहाटे हिवरा येथील बंडू जगदाळे या शेतकऱ्यानेही सोयाबीन पाण्यात भिजून नुकसान झाल्याने व वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले २ लाख रुपये कसे फेडायचे या विवंचनेतून जीवन संपवले. १२ दिवसांच्या कालावधी दरम्यान तालुक्यात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.