Dharashiv: सगळंच वाहून गेलं, जगायचं कसं..? परंडा, भूम, उमरग्यात पूरग्रस्तांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:40 IST2025-09-23T12:39:36+5:302025-09-23T12:40:48+5:30

परंडा, भूम, उमरगा तालुक्यात पावसाने उडवला हाहाकार; नद्यांनी पात्र सोडून परिसर घेतला कवेत, घरे-शेतीही गेली पाण्यात

Dharashiv: Everything was washed away, how to live..? Outcry of flood victims in Paranda, Bhum, Umarga | Dharashiv: सगळंच वाहून गेलं, जगायचं कसं..? परंडा, भूम, उमरग्यात पूरग्रस्तांचा आक्रोश

Dharashiv: सगळंच वाहून गेलं, जगायचं कसं..? परंडा, भूम, उमरग्यात पूरग्रस्तांचा आक्रोश

परंडा, भूम, पाथरूड, पारगाव : मागच्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. रविवार त सोमवरच्या रात्रीतून तर पाऊस कहर बनून कोसळला. विशेषतः भूम, परंडा व उमरगा तालुक्यांस या पावसाची मोठी झाळ बसली. परंडा व भूम तालुक्यात गावे, वस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य नाहीसे झाले, तर दुसरीकडे शेतातील पिकेही वाहून गेली आहेत. अनेकांचा निवारा गेला. त्यामुळे या भागातून सगळंच वाहून गेलं, आता खायचं काय आणि जगायचं कसं, अशी विवंचना मांडत शेतकरी, महिला टाहो फोडत आहेत.

रविवार व सोमवारच्या रात्रीत जिल्हाभरात मोठा पाऊस झाला आहे. तब्बल २२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यापैकी तब्बल ९ मंडळांमध्ये १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. है सर्व मंडळ परंडा व भूम तालुक्यातील आहेत. यामुळे सर्वाधिक हानी ही या दोन तालुक्यांत आहे. येथील धरणांमधून मोठा विसर्ग सुरू झाल्याने गावांत, वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. यात शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले. शेतातील पिके पाण्यात बुडलेली असल्याने हाती काहीच लागणार नाही. अशा स्थितीत हजारो कुटुंबां पुढे जगण्याची विवंचना निर्माण झाली आहे.

नागरिक अडकले, हेलिकॉप्टर बचावाला...
- परंडा तालुक्यातील अनेक १ गावांमध्ये नागरिक पुराच्या वेढघात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हेलिकॉप्टरची मदत मागवली.
- देवगाव येथील २८ व्यक्त्तींसह २ वस्त्यांवरील सुमारे ६० नागरिकांना हेलिकॉप्टरने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
- लाखी गावातील १२ व्यक्तींना, तर रुई येथील १३ जणांना बोटीच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
- घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर येथे अडकलेल्या नागरिकांव्या बचावासाठी 'एनडीआरएफ'ची टीम पाण्यात उतरली आहे. 
 - सायंकाळपर्यंत आणखी सुमारे १५० व्यक्तींचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. यासाठी आर्मीची टीमही दाखल झाली आहे.

तीनशे घरे पडली, १४० जनावरे दगावली...
भूम तालुक्यात पावसाने मोठी हानी केली आहे. सर्वाधिक पशुधन संख्या असलेला हा तालुका आहे. दूध, खवा उत्पादनाचे हब असल्याने पशुधनाची जोपासना येथे केली जाते. रात्रीच्या पावसाने सोमवारी सायंकाळपर्यंत १४० जनावरे दगावल्याची माहिती हाती आली प्रत्यक्षात हा आकडा आणखी वाढू शकतो. तर नागरिकांच्या डोईवरचे तब्बल ३०७ निवरेही कोसळले आहेत. 

परंड्यात नद्यांना पूर, या गावांना झळ...
परंडा तालुक्यातील सीना, खैरी, नळी, दुधना, सोनगिरी नद्यांना पूर आल्यामुळे सौना कोळेगाव, खासापुरी चांदणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वडनेर, देवगाव, आवरपिंपरी, वाधेगव्हाण, सकात, सिरसाव, लाकी, बुकी, सोनगिरी, सरणवाडी, शेळगाव, डगपिंपरी,

जनकापुरात पाणी, हायवे एकेरी सुरू...
मांजरा नदीपात्र सोडून तब्बल एक किमी अंतराने विस्तीर्ण होत वाहू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. नदीच्या पुराचे पाणी वाशी तालुक्यातील जनकापूर गावात शिरल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर पारगावजवळील सोलापूर- धुळे महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली होती.

पूल वाहून गेले अन् काही खचले...
पाथरूड, आंबी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने बेदरवाडी गावाला जोडणारा पूल निम्मा वाहून गेल्याने संपर्क तुटला, भूम-जामखेड मार्गावरील पाथरूड येथील दुधना नदीवरील पूल खचला आहे. अंतरवली येथीलही पूल खचल्याने धोका निर्माण झाला आहे. गोसावीवाडी येथील पूल वाहून गेल्याने गैरसोय झाली. सावरगाव येथील भूम-जामखेड रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्याने नुकसान झाले.

झोपेतील देवनाबाईंचा घेतला पुराने बळी...
भूम तालुक्यातील चिंचोली येथील देवनाबाई नवनाथ वारे (७०) या आपल्या वस्तीवरील ज्याच्या शेडमध्ये राहत होत्या. रविवार व सोमवारच्या रात्री लगतच्या ओढ्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाह देवनाबाई यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. यात झोपेत असलेल्या देवनाबाई वारे यांना काही कळायच्या आतच पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

बाणगंगेच्या पुराने उडाली दाणादाण...
बाणगंगा नदीस पूर आल्याने अंतरगाव येथील ४०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. ५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. १०५ घरांची पडझड झाली व १२ जनावरे वाहून गेली आहेत. पिंपळगाव येथे विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील १७ गायी जागीच दगावल्या, १५ वासरे व १० गाई वाहून गेले.

भूम तालुक्यातून १४ जणांचे रेस्क्यू...
भूम तालुक्यातील ३ गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. यामध्ये १४ नागरिक अडकून पडले होते. तांबेवाडी येथील ६, ईट येथील १, तर ईडा येथील ७ व्यक्तींना बोटीच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

पोटापाण्याचा आधार असलेला उंट गेला...
कळाब तालुक्यातील गौर येथील धर्मा तात्याबा काकडे उंटवारीतून हाती पडणाऱ्या चार पैशांतून कुटुंबाची गुजराण करीत होते. रात्रीच्या पावसात या उंटाचा मृत्यू झाल्याचे माजी पं.स. सदस्य हनुमंत माने यांनी सांगितले. तर गौर येथीलच तुकाराम शिवाजी शेळके पोल्ट्री शेडमधील १ हजार ४५७कोंबड्याही दगावल्या आहेत.

परंड्याचे रस्ते बंद..
परंडा तालुक्यात सध्या सगळीकडे पुराची स्थिती आहे. यामुळे परंडा-बार्शी, परंडा-कुर्दुवाडी राज्य मार्गावरील रस्त्यावर दहा ते पंधरा फूट पाणी वाहत असून, हे दोन्ही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

हिवर्ध्यात तलाव फुटला...
भूम तालुक्यातील हिवर्डा येथे पाझर तलाव फुटल्याने २० ते २५ एकर जमीन पाण्यात गेली आहे. पाथरूड येथे ६ घरांची पडझड होऊन १ जनावर दगावले आहे. अंजनसौंडा येथे ३ घरांची पडझड झाली आहे. देवंग्रा येथे १ जनावर दगावले आहे. सुनगिरी येथे तीन घरांची पडझड होऊन तब्बल २० हेक्टर शेती खरडून गेली आहे.

२२ महसूल मंडळांमध्ये पाणीच पाणी...
सोमवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण, केशेगाव, नळदुर्ग, परंडा, आसू, जवळा, अनाळा, सोनारी, भूम, वालवड, ईट, ओग्री, माणकेश्वर, मोहा, उमरगा, डाळिंब, मुरूम, मुळज, माकणी, जेवळी, पारगाय, तेरखेड़ा मंडळांत अतिवृष्टी झाली.

लोकप्रतिनिधी अलर्ट, बचाव कार्यास गती...
खा. ओम राजेनिंबाळकर यांनी पहाटे ४ वाजताच जिल्हाधिकाऱ्यांना परंड्यातील पुराची माहिती दिली. यानंतर गतीने बचावकार्य सुरू झाले. माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांनीही पहाटेपासूनच आढावा सुरू केला. हेलिकॉप्टरची मदत मागवली. स्वतः परंडयात दाखल झाले. पूरग्रस्तांसाठी जेवण, निवासाची व्यवस्था केली. आवश्यक मदत देण्याचीही घोषणा केली. माजी आ. राहुल मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी, तर माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशासनाशी संपर्क ठेवून मदतकार्याला गती मिळवून दिली.

पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण...
अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. आर्मीही मदतीसाठी दाखल झाली आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. 
- कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी

 

Web Title: Dharashiv: Everything was washed away, how to live..? Outcry of flood victims in Paranda, Bhum, Umarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.