Dharashiv Crime: "तुला स्वयंपाक येत नाही, तू वेड्यासारखी...", विवाहित मोहिनीने विष प्राशन करत आयुष्य संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:36 IST2026-03-31T19:34:11+5:302026-03-31T19:36:16+5:30
Dharashiv Crime news Latest: पती, दीर, सासू यांच्याकडून सुरू असलेला मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्यानंतर एका विवाहितेने मृत्यूला कवटाळले.

Dharashiv Crime: "तुला स्वयंपाक येत नाही, तू वेड्यासारखी...", विवाहित मोहिनीने विष प्राशन करत आयुष्य संपवले
Women Died after Domestic Harassment : स्वयंपाक येत नाही, मानपान मिळत नाही आणि सतत आजारी पडते, वेड्यासारखी दिसते अशा कारणावरून झालेल्या कंटाळून एका २९ वर्षीय विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेंद्री (ता. बार्शी) येथे घडली.
मोहिनी प्रमोद गोडगे (वय २९, रा. नालगाव, ता. परांडा, सध्या रा. शेंद्री शिवार, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसात सासू, पती, दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी छकुबाई दत्तात्रय शिंदे (रा. लोणी, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे.
लग्नानंतर दुसऱ्या महिन्यातच सुरू झाला छळ
तक्रारदार छकुबाई यांची मुलगी मोहिनी हिचा विवाह ६ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रमोद नारायण गोडगे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच सासरच्या मंडळींनी स्वयंपाक येत नाही, तू वेड्यासारखी वागतेस असे म्हणून तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
२०२३ मध्ये मोहिनी ५ महिन्यांची गरोदर असताना, "तुला पहिली मुलगी झाली आहे म्हणत तिला मारहाण केली. यात तिचा गर्भपात झाला. यानंतरही माहेरच्या लोकांनी अनेकदा समजूत काढून तिला सासरी पाठवले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मोबाईल मागताच पतीने मारली चापट
२८ मार्च २०२६ रोजी रात्री मोहिनीला तिच्या भावाशी बोलायचे होते, म्हणून पतीकडे मोबाइल मागितला. मात्र पतीने तिला चापट मारली. या जाचाला कंटाळून मोहिनीने पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरातच विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता दुसऱ्या दिवशी रात्री ९:१५ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत मोहिनीची आई छकुबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून पती प्रमोद नारायण गोडगे, दीर नामदेव नारायण गोडगे आणि सासू रसिका नारायण गोडगे यांच्यावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.