लग्नकार्यासाठी पती-पत्नी वेळेत निघाले, मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने प्राणास मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 14:13 IST2021-11-19T14:12:47+5:302021-11-19T14:13:52+5:30
या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

लग्नकार्यासाठी पती-पत्नी वेळेत निघाले, मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने प्राणास मुकले
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : अनियंत्रित भरधाव कार आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात लग्न कार्यासाठी निघालेल्या पती-पत्नी जागीच ठार झाले. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटीजवळ घडली आहे. सचिन भावसार (वय ४०) आणि राणी सचिन भावसार (वय ३४, दाेघे रा. गारखेडा,औरंगाबाद) अशी मरण पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहेत.
औरंगाबाद शहरातील गारखेडा येथे राहणारे भावसार कुटुंबिय कारमधून (क्र. एमएच. २०-सीएस. ०६७०) तुळजापूर मार्गे उमरगा तालुक्यातील गंजोटी येथे लग्न कार्यासाठी जात हाेते. हे कुटुंबिय गंधोरा पाटीजवळ आले असता, अचानक ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात सचिन भावसार आणि राणी सचिन भावसार हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर मुलगा सर्वज्ञ सचिन भावसार (वय १३) हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच गंधोरा येथील पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे यांसह ग्रामस्थांनी रूग्णवाहिका घटनास्थळी बोलावली आणि जखमी मुलगा सर्वज्ञ भावसार यास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. सर्वज्ञवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान, घटनास्थळी पाेहेकाॅ बालाजी कांबळे, पाेहाेकाॅ काळे आदींनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेले मृत्तदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सलगरा (दि.) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविले.